पुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस
वृत्तसंस्था / श्रीनगर
: जम्मू-कश्मीरमध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातले मतदान सुरू असतानाच पुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग व लडाख या दोन जागांवर मतदान सुरू आहे. मतदानासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले असून या निवडणुकीस कश्मीरमधील फुटीरतावाद्यांचा तीव्र विरोध आहे. असे असतानाही नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी येत असल्याने मतदानात अडथळा आणण्यासाठी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी काल शोपियान व पुलवामा येथे अनेक ठिकाणी दगडफेकीबरोबरच जाळपोळीच्या घटना घडल्या. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना पॅलेट गन बरोबरच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. यात मतदान केंद्रावरील अनेक कर्मचारीही जखमी झाले. तर हिंसक जमावाने काही ठिकाणी सरकारी इमारतींना आगी लावल्या. यावेळी शोपियानमध्ये सोहेल अहमद दर नावाचा तरुण जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर झावूरा भागात स्थानिक तरुणांनी मतदान केंद्रावर केलेल्या दगडफेकीत अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. तर नारपोर येथे स्थानिक तरुणांच्या हल्ल्यात निवडणूक अधिकारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-06


Related Photos