जांभुळखेडा स्फोटाची चौकशी अंतिम टप्प्यात , एसडीपीओ काळे सक्तीच्या रजेवर


- अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, ऑपरेशन) राजेंद्रसिंग यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरुंग स्फोट घडवून १५ जवान आणि चालकाचा जणांचे बळी घेतला.   स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, ऑपरेशन) राजेंद्रसिंग यांनी दिली. दरम्यान कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेला काळे यांनाच जबाबदार धरत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहिदांच्या कुटुंबीयांनी केली आहे. 
  नक्षलवाद्यांनी रस्त्यात स्फोटके पेरून जवानांनी भरलेले खासगी वाहन उडवून दिले. या स्फोटात १५ जवान आणि वाहनचालक असे १६ जण शहीद झाले. या स्फोटाची चौकशी एडीजी राजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ते शनिवारी सायंकाळी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना स्फोट कसा झाला आणि कोणती कारण आहेत, त्याबाबत ओझरती माहिती दिली. छुप्या पद्धतीने घात करणे ही नक्षल्यांची नेहमीचीच पद्धत आहे. मात्र, पोलिसांनी नक्षलभागात काय सतर्कता बाळगावी, त्याचे नियम आहे. छोटीशी चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.  एसडीपीओ शैलेश काळे यांचा  निष्काळजीपणा या स्फोटाला कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे, त्याकडे राजेंद्रसिंग यांचे लक्ष वेधले असता त्याची आम्ही चौकशी करीत असल्याचे ते म्हणाले. काळेचा यापूर्वीही डिफॉल्ट रिपोर्ट पाठविण्यात आला होता, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता संवेदनशील नक्षलभागात त्यांना ठेवण्यात आले. त्यांच्या वादग्रस्त व्यक्तीसोबतच्या मैत्रीचाही मुद्दा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला असता संबंधित सर्वच जणांचे कॉल डिटेल्स काढण्यात येतील, असे ते म्हणाले. या संबंधाने उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी तपास सुरू असल्यामुळे बोलणे योग्य होणार नाही, असे म्हटले. येत्या दोन दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढची दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-05


Related Photos