सिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील स्वाक्षरी केलेल्या कोऱ्या धनादेशाद्वारे दीड लाखांची उचल केल्याप्रकरणी एकास अटक


- आरोपीस ४ दिवसांची पोलीस कोठडी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
येथील ग्रामीण रूग्णालयातील स्वाक्षरी केलेला कोरा धनादेश  नेऊन त्यावर दीड लाख रूपयांची रक्कम लिहून सदर रक्कम बँकेतून उचल केल्याप्रकरणी  सिरोंचा पोलिसांनी बँक ऑफ इंडिया मध्ये रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्याला काल ३ मे रोजी अटक केली आहे.  प्रवीणकुमार येलय्या गादम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ६ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील विविध कामे व इतर साहित्य खरेदीसाठी वैद्यकीय अधिकारी मनिष धकाते यांची स्वाक्षरी केलेला कोरा धनादेश  ग्रामीण रूग्णालयातील लिपीक अमित डांगोरे यांनी आपल्या कक्षातील टेबलच्या कपाटात ठेवला होता. सदर धनादेश अज्ञात इसमाने चोरून त्यावर दीड लाख रूपयांची रक्कम 'सेल्फ' लिहून बँक ऑफ  इंडिया शाखा सिरोंचा येथून २५ एप्रिल २०१९ रोजी काढली. सदर बाब महिनाअखेरीस स्टेटमेंटव्दारे निदर्शनास आली. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयात एकच खळबळ उडाली.  ग्रामीण रूग्णालयातील लिपीक, डॉक्टरांच्या निर्देशावरून १ मे २०१९ रोजी  सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 
तपासादरम्यान बॅंकेतील रोजंदारी कर्मचारी प्रविणकुमार गादम याने रक्कम काढल्याचे उघडकीस झाले. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
धनादेश प्रविणकुमार जाधम याच्याकडे आला कसा याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने बॅंकेतच धनादेश मिळाल्याची माहिती दिली. मात्र रूग्णालयाच्या टेबलमधील कपाटातून धनादेश बॅंकेत पोहचला कसा आणि बॅंकेने कोणतीही चौकशी न करता जाधम याला दीड लाख रूपयांची रक्कम दिली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्याच्या खात्यातून रक्कम काढत असताना सबंधित व्यक्तीला आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो. तसेच जाधम हा बॅंकेतील रोजंदारी कर्मचारी असल्याने रूग्णालयातील रक्कमेशी काय संबंध याची चौकशी  बॅंकेतील अधिकाऱ्यांनी करायला हवी होती. मात्र तसे न करता थेट रक्कम दिल्यामुळे बॅंकेच्या कारभाराप्रती शंका उपस्थित केली जात आहे. याआधीसुध्दा सिरोंचा येथील बॅंक ऑफ इंडीया शाखेतील ग्राहकांनी विविध तक्रारी केल्या आहेत. यामुळे बॅंकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुध्दा चौकशी करण्यात यावी, तसेच रुग्णालयातून धनादेश बाहेर गेला कसा आणि रुग्णालयातील कोणाचा हात आहे का याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-04


Related Photos