नेत्रदानात नागपूर विभागातुन भंडारा जिल्हा प्रथम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  जगात अंधांची संख्या ५ कोटीच्या पुढे असून त्यातील १ कोटी ३० लाख अंध भारतात आहेत. या अंधांपैकी जवळजवळ २० लाख बालकांची संख्या आहे. अशा परिस्थितीत नेत्रदान हे पवित्र कार्य करण्यासाठी नागरिकांना केलेल्या आवाहनामुळे भंडारा जिल्हयामध्ये नेत्रदानाचे १३२ टक्के उद्दिष्टयपुर्ण झाले आहे. चालू वर्षात ४० नेत्र बुबुळ गोळा करण्याचे उद्दिष्टय असतांना भंडारा जिल्हातील आरोग्य विभागाने ५३ नेत्र बुबुळ संकलन करुन नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 
मागील पाच वर्षात जिल्हा सामान्य रुगणालय, भंडारा येथे नेत्रविभागातर्फे मोतियाबिंदू शस्त्रक्रिया  उदि्दष्टापेक्षा अधिक करण्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये २३२ टक्के, २०१५-१६ मध्ये १८५ टक्के, २०१६-१७ मध्ये १४८ टक्के‍, २०१७-१८ मध्ये २४० टक्के व २०१८-१९ मध्ये १९८ टक्के मोतियाबिंदू शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्ण करण्यात आले. नेत्रदान अनुक्रमे ९६ टक्के, ९० टक्के, ९४ टक्के, १०२ टक्के व १३२ टक्के उद्दिष्टपूर्ण करण्यात नेत्रविभागाने यश संपादन केले आहेत. पारदर्शक असणारे डोळयाचे बुबुळ जीवनसत्व अ च्या अभावामुळे, डोळे येण्यामुळे, डोळयांना इजा होण्यामुळे तसेच अन्य आजाराने अपारदर्शक होऊन अंधत्व येते. त्यावर उपाय म्हणजे  अपारदर्शक बुबुळ काढून त्या ऐवजी स्वच्छ व पारदर्शक पातळ बुबुळ रोपण करुन अंधत्व दूर करणे हा आहे. भंडारा जिल्हयात ५३ दात्यांनी बुबुळ दान केल्यामुळे मृत्यु नंतरही हे जग पाहण्याचे पुण्य दात्यांना मिळणार आहे. या अत्यंत मानवतावादी आणि पवित्र कार्यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून समाजसेवी संस्थांनी आणि व्यक्तींनी, शिक्षकांनी लोकांना प्रबोधन करुन प्रवृत्त करणे, त्याआधी मरणोत्तर नेत्रदानाचा स्वत: संकल्प करणे यासाठी पुढे येण्याची गरज आहे. या आपल्या निर्णयाची देशातील ४६ लाख अंध प्रतिक्षा करीता आहेत. नेत्रदान  ही आता काळाची गरज समजून  विश्वातील मानवांची लोकचळवळ व्हावी, हीच या मागील भूमिका आहे.
भारतात दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक नेत्रपटलाची आवश्यकता असून सध्या केवळ पन्नास हजार नेत्रपटले नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. भारतात दरवर्षी एक कोटीच्या जवळपास लोक या  कारणाने मृत्यूमुखी पडतात. या सर्व मानवी मृत देहाची अग्नी देवून, जमिनीत पुरवून किंवा अन्य प्रकारे अंतिम विल्लेवाट लावली जाते. मृतदेह नष्ट करतांना अंत्यत मोल्यवान असे अंधाना दृष्टी देवू शकणारे नेत्रही नष्ट केले जातात. हे योग्य नाही, आपले हे मौल्यवान डोळे इतरांच्या उपयोगी आणायचे असल्यास किंवा मृत्युनंतर अवयवदान  करावयाचे असल्यास जिल्हा समान्य रुग्णालय भंडारा येथील नेत्रविभागात संपर्क साधावा. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामूळे अंधत्व येवू नये आणि जर आलेच तर अशा व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे, ही काळाची गरज असल्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिता बढे तसेच नेत्र शल्य चिकित्सक डॉ. रेखा रविशेखर धकाते यांनी केले आहे. सन २०१८-१९ मध्ये जिल्हा रुग्णालय भंडाराचे नेत्रदानाचे कार्य १३२ टक्के भंडारावासियांच्या सहकार्याने झालेले आहे. या कार्याकरीता नेत्र विभागातील चमु जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. रेखा धकाते, डॉ. विनोद घडसिंग, डॉ. करुणा खोब्रागडे, डॉ दुर्गेश पशिने, डॉ. धिरज लांबट, डॉ. स्नेहा डोकरीमारे, ए.डी. रंगारी, अजय आगाशे, संजय शेंडे, केशव राऊत, श्री. मुरखे यांनी अहोरात्र वेगवेगळया ठिकाणी जावून नेत्रसंकलनाचे कार्य पार पाडले आहे. तसेच नेत्रदान समुपदेशक सोनाली लांबट यांनी आपल्या समुपदेशनातून नेत्रदान ही  काळाची गरज आहे, असे पटवून दिले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-05-04


Related Photos