१५ जवानांचा बळी घेणाऱ्या नक्षल्यांचाही आत्मसमर्पणानंतर शासन सन्मान करणार का?


- जांभुळखेडा स्फोटाच्या  घटनेनंतर  जनसामान्यांत रोष
- आत्मसमर्पणानंतर शासनाला नक्षल्यांचा पुळका का?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षलवाद कमी करण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. पोलिस विभाग गोळीला गोळीने उत्तर देत असतानाच शासनाने २००५ पासून आत्मसमर्पण योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत आतापर्यंत ६१२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. योजनेंतर्गत नक्षल्यांना 3 लाख रूपये, शासकीय योजनांचा लाभ, राहण्यासाठी जागा, घर तसेच रोजगार सुध्दा उपलब्ध करून दिला जाते. तसेच सन्मानाने त्यांचे स्वागत केले जाते. यामुळे नक्षल्यांना घटना घडविल्यानंतरही आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहन मिळते.  आता जांभुळखेडा येथे झालेल्या घटनेनंतर या घटनेत सहभागी नक्षली जर आत्मसमर्पण करतील तर त्यांचा अशाप्रकारे सन्मान करणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळ नक्षल्यांनी स्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविले. या घटनेत १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनचालक ठार झाला. जांभुळखेडाच्या घटनेनंतर तिव्र संताप व्यक्त होत आहे. जनसामान्यांत नक्षल्यांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. तसेच शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत ठिकठिकाणी श्रध्दांजली अर्पण केली जात आहे. शहीद जवानांना मानवंदना देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी घटनेचा संपूर्ण तपास करून नक्षल्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. मात्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे मोठ्या घटनांमध्येही सहभाग असलेले नक्षली एखाद्या सामान्य गुन्हेगारांप्रमाणे कसे होतात, त्यांच्यावर केवळ खटले चालवून प्रकरण मिटविण्यात येते. यामुळे सामान्य नागरीकांमध्ये या योजनेप्रती रोष दिसून येत आहे. 
जिल्ह्यात पोलिस विभागाकडून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येते. आजपर्यंत अनेक नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र यासोबतच शासनाच्या आत्मसमर्पण योजनेची अंमलबजावणीसुध्दा पोलिस विभागाला करावी लागत आहे. पोलिस विभागामध्येसुध्दा हिंसक नक्षल्यांबद्दल रोष आहे. पण शासनाची योजना असल्यामुळे योजना राबविणे आलेच. 
वर्ष १९९१ पासून आतापर्यंत जिल्ह्यात १५० च्या जवळपास पोलिस जवान नक्षली हल्ल्यात शहीद झाले आहेत. नक्षल्यांनी अनेक निष्पाप नागरीकांचीसुध्दा हत्या केली आहे. जाळपोळ, चकमकी, शासकीय मालमत्तेचे नुकसान, अपहरण, स्फोट अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये नक्षल्यांचा सहभाग असतो. अशा असंख्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या नक्षल्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पीत नक्षल्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून स्वागत केले जाते. शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. घरे, रोजगार देण्यात आला. यामुळे सामान्य नागरीकांमध्ये शासनाच्या या योजनेप्रती चुकीचा संदेश जाउ लागला आहे. हिंसक नक्षली जांभुळखेडा सारख्या घटना घडवून आणत जवानांचे बळी घेतात, मग याच घटनेतील नक्षली उद्या आत्मसमर्पण करत असतील तर एवढा सन्मान देणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-04


Related Photos