शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून २५ लाख, घरासाठीही सरकार मदत करेल : मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या १५  पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून २५  लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या वास्तव्यास लागणाऱ्या घरासाठीही सरकार मदत करेल,  शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी सरकारचीच राहिल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.  
 जांभूरखेडा येथे सी- ६० (क्यूआरटी)  हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षल्यांनी  भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५  जवान शहीद झाले. तसेच वाहनचालकाला प्राण गमवावा लागला. चालक   तोमेश्वर भागवत सिंगनाथ याला शहिदाचा दर्जा देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सिंगनाथ यांच्या परिवाराला योग्य मदत देऊ, असं आश्वासनं पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे. तर, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २५  लाख रुपये रोखीने म्हणजेच बँकेत त्यांच्या नावे चेकने जमा केले  जाणार आहेत. तसेच जवानांना कॅडरनुसार घरंही दिले जाईल आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही जबाबदारी सरकार घेईल, असे मुनगंटीवर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. 
 यापूर्वी नक्षलवादी मारण्याचा दर ४.४८  होता. मात्र, या पाच वर्षात ९८  नक्षलवादी मारले असून तो दर साधरणत: २०  वर पोहोचला आहे. गेल्या ३९  वर्षात २०१८  मध्ये एकही दुर्दैवी घटना पोलीस दलाबाबत घडली नाही. मात्र, यंदा ही दुर्दैवी घटना घडल्याचं दु:ख असल्याचेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. दरम्यान,गेल्या सरकारनेही नक्षलवाद संपुष्टात येण्यासाठी उत्तम काम केलं आहे. त्यामुळे, आमचं किंवा त्यांचा सरकार हा मुद्दा येत नाही. आमचं सरकारही नक्षलवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-03


Related Photos