महत्वाच्या बातम्या

 १४ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने १४ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून महोत्सवात दैनंदिन आहारातून लुप्त पावत चाललेल्या विविध रानभाजीचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशन समोरील द रुरल मॉल येथे आयोजित रानभाजी महोत्सवात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध प्रकारच्या रानभाजी प्रदर्शनी व विक्री करीता उपलब्ध असणार आहे. यामध्ये कुंजर, अंबाडी, पाथरी, कारडु, कपाळफोडी, गवती चहा, शेवगा, करवंद, अळू धोपा, चिवर, गोडनिम, तरोटा, राजगिरा, आघाडा, केना, सुरण, फास, बरबटी, कुकडा, घोगली,  गोगलगाय भाजी, ताजे मशरुम, भुईनीम, आंबटचुका, मायाळु पोई, माठ, गुळवेल, करवंदाचे लोणचे, अंबाडीचे पदार्थ सरबत, पावडर, भाकर, लोणचे, बेलाचे लोणचे, सरबत यासारख्या विविध प्रकारच्या रानभाज्या व विविध प्रकारचे लोणचे, सरबत प्रदर्शनात विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे.

महोत्सवादरम्यान पाककृती सुध्दा करुन दाखविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास रानभाजी खरेदीसाठी व रानभाजीचे आपल्या शरीरासाठी असलेले महत्व जाणून घेण्यासाठी भेट देऊन महोत्सवातील रानभाजी खरेदी करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. तसेच आर्थिक स्थैर्य अबाधीत राखण्यासाठी मदत करावी. सोबतच महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेले अंबाडी व मिक्स भाकरी इत्यादीच्या स्टॉलला भेट देऊन खाद्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos