घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा माग काढण्यासाठी फ्रेंच बनावटीचे हेलिकॉप्टर


- तीन वरिष्ठ वैमानिकांना जर्मनीत प्रशिक्षण
वृत्तसंस्था / मुंबई : 
राज्यात गेल्या काही दिवसांत नक्षल चळवळ अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून आले आहे. घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा माग काढणे कठीण असते. त्यामुळे आकाशातून जंगलावर लक्ष ठेवण्याकरिता अधिक सोयीचे असते. फ्रेंच बनावटीचे ‘एच १४५’ हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.  हे हेलिकॉप्टर चालवण्यासाठी राज्य सरकारच्या विमान चालन संचालनालयातील तीन वरिष्ठ वैमानिकांना जर्मनीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. या तीनही वैमानिकांना जर्मनीतील डोनावर्थ-मँनचिंगमध्ये ७५ दिवसांचे खडतर प्रशिक्षण दिले जाईल. नक्षलग्रस्त तसेच जंगलाच्या भागातून हेलिकॉप्टर उडवण्याचे खास प्रशिक्षण या तीन वैमानिकांना देण्यात येणार आहे.
मुख्य वैमानिक कॅप्टन संजय कर्वे,  वरिष्ठ वैमानिक कॅप्टन महेंद्र दळवी , सहवैमानिक कॅप्टन मोहित शर्मा याना प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे.  या वैमानिकांच्या प्रशिक्षणावर राज्य सरकार सुमारे ७ लाख ३० हजार ५०० रुपये खर्च करणार आहे
नक्षलविरोधी अभियानासाठी मागील आठ वर्षांपासून पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात येत आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे २५ कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे राज्य सरकारने नक्षलविरोधी अभियानासाठी ‘एच १४५’ या हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला .  एअरबस हेलिकॉप्टर या कंपनीकडून या हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये दोन पायलट व दहाजण प्रवास करू शकतील. नक्षलवादविरोधी अभियानासोबत नैसर्गिक आपत्तीच्या वेळेत मदतकार्य करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग करता येईल. कारण यामध्ये स्ट्रेचरसह वैद्यकीय उपचारांचे साहित्य  तैनात करता येईल.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-03


Related Photos