महत्वाच्या बातम्या

 जागतिक आदिवासी गौरवदिनी कोयनगुडा गावात वृक्षारोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील जागतिक कीर्तीचे समाजसेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाच्या वतीने नजीकच्या कोयनगुडा गावात जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून बुधवारी ०९ आगस्ट २०२३ ला वृक्षदिंडी काढून विविध प्रजातींचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

आदिवासी संस्कृती आणि पर्यावरण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जंगल व जंगलात वावरणारे पशू-पक्षी, कीटक व अन्य जीवजंतू यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे. त्याकरीता दरवर्षी लोकबिरादरी प्रकल्पातर्फे वृक्षदिंडी काढून ०९ आगस्टला जागतिक आदिवासी गौरवदिनी वृक्षारोपण केले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून नजीकच्या कोयनगुडा गावात विविध प्रजातींचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

सर्वप्रथम आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके आदींच्या प्रतिमांपुढे मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्ज्वलित करुन व पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या पालखीत रोपटे ठेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. लेझिम-हलगीच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने नाचत तसेच पर्यावरणावर आधारित विविध घोषणा देत वृक्षदिंडी लोकबिरादरी आश्रम शाळा ते कोयनगुडा गावात पोहचली. गावकऱ्यांनी वृक्षदिंडीचे स्वागत केले. त्यानंतर लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांचे हस्ते सर्वप्रथम वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी लोकबिरादरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम झोडे, शरीफ शेख, अमित कोहली, प्रफुल्ल पवार, विनीत पद्मावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नाल्याच्या पैलतिरावरुन रस्त्याच्या दुतर्फा तसेच लोकबिरादरी प्रकल्पाने खोदून दिलेल्या तलावाच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गिरीश कुलकर्णी, क्रीडा शिक्षक विवेक दुबे, अधिक्षक अशोक चापले, प्रा. खुशाल पवार, सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, हिना गुट्टेवार, स्नेहल चौधरी, विजया किरमिरवार, परमात्मा पंधरे, अमोल बावनकर, जयश्री शेंडे, वर्षा उधळे तसेच कोयनगुडा गावातील गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos