जांभुळखेडाच्या घटनेला जबाबदार कोण?, जवानांना पाठविताना झाला निष्काळजीपणा!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१ मे रोजी महाराष्ट्र दिनीच नक्षल्यांनी भुसुरूंग लावून पोलिस जवान जात असलेले खाजगी वाहन उडवून दिले. यामध्ये १५ पोलिस जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनचालक सुध्दा ठार झाला. या घटनेमुळे आता  अनेक प्रश्न उपस्थित झाले  असून पोलिस विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरल्याचे बोलल्या जात आहे. तसेच घटनेला जबाबदार कोण ? , याचा शोध घेण्याचे आव्हान आता उभे ठाकले आहे.
३० एप्रिल रोजीच्या रात्री कुरखेडापासून काही अंतरावर असलेल्या दादापूर येथे नक्षल्यांनी ३६ वाहने जाळली. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या भागात पोलिस जवानांना पाठविण्याचे काम सुरू झाले. जाळपोळीच्या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे हे दुचाकीने पुराडापर्यंत गेल्याची चर्चा आहे. यावेळी त्यांनीच जवानांना पाठविण्याची योजना आखल्याची चर्चा आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मोठी नक्षल घटना असतानाही आणि नक्षली घातपात लावू शकतात याची कल्पना असतानाही जवानांना खाजगी खुल्या वाहनातून पाठविण्यात आले. तसेच प्रत्येक घटनेनंतर रोड ओपनिंग, मेटल डिटेक्टर ने रस्त्यांची तपासणी केली जाते. मात्र या घटनेआधी अशी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. तसेच नक्षल्यांनी मोठ्या संख्येने वाहने जाळून मोठी फौज या भागात सक्रीय असल्याचे दाखवून दिले असतानाही एखाद्या भुसुरूंग प्रतिरोधक वाहनाने जवानांना न पाठविता खाजगी खुल्या वाहनातून का  पाठविण्यात आले. तसेच नेमके याच वाहनातून जवान प्रवास करीत आहेत, याची इत्यंभूत माहिती नक्षल्यांपर्यंत पोहचली कशी हा प्रश्नसुध्दा उपस्थित झाला आहे. 
पोलिस विभागाने उत्तरेकडील भागात नक्षल्यांच्या कारवाया कमी झाल्याचे समजून सिमावर्ती भागात लक्ष्य केंद्रीत केले आहे. यामुळे नक्षल्यांनी हा भाग हेरला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर नक्षल्यांनी घातपात घडवून हे सिध्द करून दिले आहे. या घटनेचा सखोल तपास करणे आवश्यक असून पोलिस महासंचालकांकडून तपास केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या घटनेत कोणत्या प्रकारची स्फोटके वापरण्यात आली, स्फोट कशाप्रकारे घडविण्यात आला. स्फोटके आली कुठून, वाहनाबद्दल नक्षल्यांपर्यंत पोहचली कशी याबाबतची सर्व चौकशी करून नक्षल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत   म्हटले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-03


Related Photos