पोलिस विभाग आणि शासन शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी


- पोलिस महानिरीक्षक सुबोध जयस्वाल यांची पत्रकार परिषदेत माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी केलेल्या घातपातामध्ये १५ जवान शहीद झाले. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तसेच पोलिस विभाग आणि शासन शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत असून संपूर्ण मदत केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सुबोध जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला पोलिस उपमहानिरीक्षक शरद शेलार, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, राजेंद्र सिंग आदी उपस्थित होते.
पुढे बोलतताना जयस्वाल म्हणाले, सर्व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत जाहिर केली आहे. तसेच प्रत्येकाच्या कुटूंबातील एका व्यक्तीस नोकरी दिली जाणार आहे. प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटीच्या जवळपास   रक्कम मिळू शकते, असेही ते म्हणाले.

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने आमचे मनोबल खच्ची होणार नाही. आम्ही नक्षलवादाविरोधात कारवाई सुरूच ठेवणार आहेत. पूर्ण ताकदीने कारवाई करू. नक्षलवाद्यांना सोडणार नाही. आमचा प्लॅन तयार आहे. लवकरच तो कृतीतून दिसेल. झालेल्या चुका सुधारू, असं सांगत जयस्वाल यांनी नक्षलवाद्यांना इशारा दिला आहे. 
निवडणुकीत खोडा घालण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न मोडून काढला. यामुळे नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. पोलीस दल गाफिल नव्हतं. आताच्या परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाईत सुधारणा करू. मी स्वतः गडचिरोलीच्या एसपी पदावर काम केलंय. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आताच्या परिस्थितीनुसार आढावा घेऊन रणनितीत बदल करू. 
संपूर्ण आव्हानांचा सखोल आभ्यास करू आणि पुन्हा अशा घटना होणार नाही याचीही काळजी घेऊ. तीच चूक पुन्हा करणार नाही. हल्ल्यातून नक्कीच धडा घेऊ, असं सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. 

चालक सिंगनाथ यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार मदत

काल झालेल्या नक्षल हल्ल्यात खासगी वाहनाचा चालक तोमेश्वर भागवत सिंगनाथ यांचा मृत्यू झाला. सिंगनाथ यांनाही शहीदाचा दर्जा देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा चालू ठेवणार. सिंगनाथ यांच्या कुटूंबीयांनाही योग्य ती मदत मिळवून दिली जाणार, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सुबोध जयस्वाल यांनी दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-02


Related Photos