मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना


- शहीदांचे कुटूंबीय आणि पोलिस जवानांच्याही आक्रोशाने गहिवरला पोलिस मुख्यालयाचा परिसर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळील नाल्यावर नक्षल्यांनी स्फोट घडवून आणत पोलिस जवानांचे वाहन उडवून दिले होते. या घटनेत सी - ६० च्या अतिजलद प्रतिसाद दलाचे १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनाच्या चालकाचासुध्दा या घटनेत मृत्यू झाला. शहीद पोलिस जवानांना आज पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बंदुकीच्या ३ फैरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी शहीदांचे कुटूंबीय आणि पोलिस जवानांच्या  आक्रोशाने पोलिस मुख्यालयाचा परिसर गहिवरला होता. 
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेरखर बावनकुळे, गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम, खा. अशोक नेते, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर, आ. डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारी, अिआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.
काल झालेल्या नक्षल हल्ल्यात साहुदास बाजीराव मडावी, रा.चिखली, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली, प्रमोद महादेवराव भोयर, रा.देसाईगंज, ता.देसाईगंज, राजू नारायण गायकवाड, रा मेहकर जि.बुलढाणा, किशोर यशवंत बोबाटे रा. चुरमुरा. ता.आरमोरी, संतोष देविदास चव्हाण, रा.ब्राम्हणवाडा, ता.औंधा, जि.हिंगोली, सर्जेराव एकनाथ खर्डे, रा. आलंद, ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा, दयानंद ताम्रध्वज शहारे, रा. मोठी दिघोरी, ता.लाखांदूर जि.भंडारा, भूपेश पांडुरंग वालोदे, रा. लाखनी, ता.लाखनी, जि.भंडारा, आरिफ तौशिब शेख, रा.पाटोदा, जि.बीड, योगाजी सीताराम हलामी, रा.मोहगाव, ता.कुरखेडा, पुरणशहा प्रतापशहा दुगा, रा.भाकरोंडी, ता.आरमोरी, लक्ष्मण केशव कोडापे, रा.येंगलखेडा, ता.कुरखेडा, अमृत प्रभुदास भदाडे, रा. चिंचघाट, ता.कुही, जि.नागपूर, अग्रमन बक्षी रहाटे, रा. तरोडा, ता.आर्णी, जि.यवतमाळ, नितीन तिलकचंद घोडमारे,रा. कुंभली, ता.साकोली, जि.भंडारा अशी शहीद जवानांची नावे आहेत.  या भूसुरुंगस्फोटात गाडीचालक तोमेश्वर भागवत शिंगनाथ (२५) रा.कुरखेडा, जि.गडचिरोली हा देखील ठार झाला. 
जवानांना सर्वप्रथम तिरंगा ध्वज अर्पण करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. बंदुकीच्या ३ फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. यानंतर कुटुंबीयांनी शहीदांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व शहीद जवानांचे पार्थिव रवाना करण्यात आले. याप्रसंगी पोलिस मुख्यालयातील वातावरण अत्यंत भावपूर्ण होते. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेतच पोलिस जवानांनाही अश्रु आवरणे कठीण झाले होते. शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-02


Related Photos