जांभूरखेडा येथील घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यावरही शोककळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  बुलडाणा :
गडचिरोली जिल्ह्यातील जांभुरखेडा येथे  नक्षल्यांनी  केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०) रा.  आळंद, ता. देऊगाव राजा  आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) या जवांनांचाही समावेश आहे. या दोन्ही जवानांच्या शहीद होण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर  शहीद राजू गायकवाड यांचे आई-वडील  गडचिरोलीला  रवाना झाले. मेहकर शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील वॉर्ड क्र. सात मध्ये ते कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचा मोठा भाऊ   वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आजारपणात मृत्यूमुखी पडला होता. शहीद राजू गायकवाड हे २००९ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांना पाच वर्षाची मुलगी (गायत्री), आठ महिन्याचा एक मुलगा (समर्थ) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील त्यांची सासुरवाडी असून १५ फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.
दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. पत्नी स्वाती, एक मुलगी नयना (३), आई, वडील व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, सकाळपासून पतीचा फोन लागत नसल्यामुळे पत्नी स्वाती हीने आळंद येथे कुटुंबियांना माहिती दिली होती. तेवढ्यात दृकश्राव्य माध्यमावर गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप खार्डेचे कुटुंबीय व नातलग हे गडचिरोलीकडे रवाना झाले होते.
गेल्या महिनाभरापूर्वीच पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नियतीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन कर्तबागर जवान हिरावून घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियातून शहीद जवानांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-02


Related Photos