केंद्रीय गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक , वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
कुरखेडा तालुक्यातील   जांभुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी काल १ मे  रोजी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. तसेच रोजंदारी वाहन चालकाचा मृत्यू झाला. घटनास्थळाला आज राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन  पाहणी केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.  
नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून  पीक अप  या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे १५ जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे.  
दरम्यान या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले आहेत. 
 लावण्यात आलेल्या बॅनर्सद्वारे एप्रिल २०१८ मध्ये कसनसूर येथे झालेल्या ४० नक्षलींच्या एन्काऊंटरचा निषेध नोंदवण्यात आला आहे. २७ एप्रिल २०१९ रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-02


Related Photos