गडचिरोली जिल्ह्यातील सहा जवानांच्या शहीद होण्याने जिल्ह्यावर शोककळा


- शहीद जवान कुरखेडा, देसाईगंज  आणि आरमोरी तालुक्यातील 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
काल  १ मे रोजी महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावानजीक नक्षल्यांनी घडविलेल्या भूसुरुंगस्फोटात गडचिरोली जिल्ह्यातील सहा जवान शहीद झाले यापैकी ३ जवान कुरखेडा तालुक्यातील , २ जवान आरमोरी तालुक्यातील तर एक जवान देसाईगंज येथील रहिवासी होते. यामुळे आरमोरी , कुरखेडा , देसाईगंज तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.  केवळ सात-आठ वर्षांची सेवा झालेल्या युवा पोलिसांना प्राण गमवावा लागल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
साहुदास बाजीराव मडावी, रा.चिखली, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली, प्रमोद महादेवराव भोयर, रा.देसाईगंज, ता.देसाईगंज, किशोर यशवंत बोबाटे रा. चुरमुरा. ता.आरमोरी, योगाजी सीताराम हलामी, रा.मोहगाव, ता.कुरखेडा, पुरणशहा प्रतापशहा दुगा, रा.भाकरोंडी, ता.आरमोरी, लक्ष्मण केशव कोडापे, रा.येंगलखेडा, ता.कुरखेडा अशी जिल्ह्यातील शहीद जवानांची नावे आहेत. 
या स्फोटात  राजू नारायण गायकवाड, रा मेहकर जि.बुलढाणा,  संतोष देविदास चव्हाण, रा.ब्राम्हणवाडा, ता.औंधा, जि.हिंगोली, सर्जेराव एकनाथ खर्डे, रा. आलंद, ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा, दयानंद ताम्रध्वज शहारे, रा. मोठी दिघोरी, ता.लाखांदूर जि.भंडारा, भूपेश पांडुरंग वालोदे, रा. लाखनी, ता.लाखनी, जि.भंडारा, आरिफ तौशिब शेख, रा.पाटोदा, जि.बीड,  अमृत प्रभुदास भदाडे, रा. चिंचघाट, ता.कुही, जि.नागपूर, अग्रमन बक्षी रहाटे, रा. तरोडा, ता.आर्णी, जि.यवतमाळ, नितीन तिलकचंद घोडमारे,रा. कुंभली, ता.साकोली, जि.भंडारा हे अन्य जिल्ह्यातील जवान शहीद  झाले आहेत. 
  भूसुरुंगस्फोटात खाजगी गाडीचालक तोमेश्वर भागवत शिंगनाथ(२५) रा.कुरखेडा, जि.गडचिरोली हादेखील ठार झाला. तोमेश्वर हा रोजंदारी चालक म्हणून दुसऱ्याच्या गाडीवर काम करीत होता.  आज २ मे रोजी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद जवानांच्या पार्थिवांना सलामी देण्यात येणार आहे.

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-02


Related Photos