महत्वाच्या बातम्या

 नागरिकांना सेवांचा लाभ तत्पर व सुलभतेने द्या : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- महसूल सप्ताहाचा समारोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महसूल विभाग हा प्रशासनातील महत्त्वाचा विभाग असून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. या विश्वासाला सार्थ ठरवत  आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना विविध सेवांचा लाभ तत्परतेने व सुलभतेने द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी डॉ. इटनकर बोलत होते. महसूल सप्ताहात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांनी महसूल सप्ताहादरम्यान करण्यात आलेल्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. इटनकर  म्हणाले की, शेतकरी हा महसूल प्रशासनाचा कणा असून कृषी संस्कृती ही महसूल विभागाशी कायमची जोडलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करतानाच त्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या मदतीसाठी  कायम तत्पर रहावे. तसेच नागरिकांना पारदर्शक पद्धतीने कामकाज करून सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. लोकांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. विकासाची कामे कालबद्ध कृती कार्यक्रम आखून पूर्ण करावे, असे आवाहन डॉ. इटनकर  यांनी केले. तत्पूर्वी १ ऑगस्टला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.





  Print






News - Nagpur




Related Photos