नक्षल्यांच्या ‘काॅल ॲम्बूश’ ने घेतला जवानांचा बळी


- शहीद जवानांची संख्या वाढण्याची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मोठ्या चकमकींमध्ये अनेक नक्षल्यांचा खात्मा तसेच अनेक बड्या नक्षल्यांचे आत्मसमर्पण, अटकसत्रामुळे चवताळलेले नक्षली आता वेगवेगळी रणनिती आखत असल्याचे दिसून येत असून आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळ भुसुरूंग घडवून आणत १५ जवानांचा बळी घेतला आहे. शहीद जवानांची संख्या वाढूही शकते. हा घातपात नक्षल्यांनी ठरवून लावला असून हा ‘काॅल ॲम्बूश’ सापळा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जांभुळखेडा परिसरात नक्षल्यांच्या हालचाली  असल्याची माहिती खबऱ्या मार्फत जाणून - बुजून पोलिसांना देण्यात आली. या परिसरात पोलिस पथक नक्षलविरोधी अभियान राबविण्याच्या हेतूने येत असतानाच भुसुरूंग घडवून आणण्यात आला. या स्फोटात वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. या वाहनाचा खाजगी चालकसुध्दा या सापळ्यात ठार झाला आहे. या घटनेतील शहीद जवानांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी अशाच प्रकारचा ॲम्बूश सापळा २१ मे २००९ रोजी धानोरा तालुक्यातील हत्तीगोटा पहाडी परिसरात लावण्यात आला होता. या घटनेत २ पोलिस अधिकारी आणि १५ जवानांनी प्राण गमावले होते. या घटनेत पहिल्यांदाच पाच महिला पोलिस शिपाई शहीद झाल्या होत्या. यावेळी नक्षल्यांनी रस्त्यावर झाडे टाकून रस्ता अडविला होता. रस्ता मोकळा करण्याच्या उद्देशाने गेलेल्या पोलिसांवर दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक हल्ला चढविला होता. यावेळी पोलिसांना प्रतिकार करण्याची कोणतीही संधी मिळाली नव्हती. अशाच प्रकारचा घातपात आजच्या घटनेत देखील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अजूनही नक्षल्यांसोबत चकमक सुरूच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-01


Related Photos