महत्वाच्या बातम्या

 ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त उपक्रम यशस्वीपणे राबवा : मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


- क्षयरोग मुक्त पंचायत उपक्रम आढावा सभा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : क्षयरोग मुक्त्‍ पंचायत उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. उपक्रमासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करुन उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे. याकरीता ग्रामपंचायतीचा सहभाग घ्यावा, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग मुक्त पंचायत उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सुचना दिल्या. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. स्वर्णा रामटेके, सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

क्षयरोग मुक्त उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार दिल्या जाणार असून सर्व ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी यावेळी केले. क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त स्पर्धा राबविण्यात येत आहे.

पंचायतराज संस्थांना सक्षम करणे, क्षयरोगाशी निगडीत समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतींमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टीबी मुक्त पंचायत या अभियानाच्या माध्यमातून समाजात विविध जनजागृतीपर कार्यक्रम शाळा, कॉलेज, धार्मिक संस्था इत्यादी ठिकाणी घेण्यात यावे व त्यामध्ये क्षयरोगाचा प्रसार निदान उपचार आहार व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्त माहिती तसेच ग्रामसभेमध्ये सदर विषयावर विस्तृत चर्चा करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.  

या स्पर्धेत निवडलेल्या ४० ग्रामपंचायतींना सहभागी व्हायचे आहे. अशा ग्रामपंचायतीची निवड करुन जागतिक क्षयरोग दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल, असे डॉ. हेमंत पाटील यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos