महत्वाच्या बातम्या

 सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- विकास भवन येथे महसूल दिन कार्यक्रम

- महसूल सप्ताहाचा समारोप

- उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महसूल विभागाला फार जुनी परंपरा आहे. बदलत्या काळानुसार कामकाजाच्या स्वरूपात नवीन बदल होत असून ते प्रत्येकाने स्विकारले पाहीजे. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा महसूल विभागाचा कणा आहे. निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन व इतरही कामांमध्ये हा विभाग नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे ऐकूण कामाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम विकास भवन येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महसूल सप्ताहाची सांगता होत असली तरी सर्वसामान्य नागरिकांची कामे वर्षभर करावयाची आहे. जिल्ह्यामध्ये नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला. त्यासाठी सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ई-ऑफिस प्रणाली तालुकास्तरावर राबविण्यामध्ये जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. हे आपल्या सर्वांचे टीमवर्क आहे. असेच समन्वयाने कामे केल्यास जिल्हा नेहमी अग्रेसर राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महसूल सप्ताहाच्या निमित्याने शासकीय योजनांचा लाभ दुर्गम भागात जाऊन देण्याची मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम, पोलिस पाटील, कोतवाल भरती, अनुकंपा भरती व इतरही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा आस्थापना विषयक बाबीं सोडविण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला, असे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणाले, महसूल विभाग हा तळागाळापर्यंत पोहचलेला आहे. कुठल्याही कामामध्ये महसूल विभागाचा सहभाग असतो. विविध लोकाभिमुख कामे जिल्ह्यात होत आहे. असेच कामे पुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. पोलिस अधीक्षक नूरूल हसन म्हणाले, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सर्व कामे महसूल विभागामार्फत होते. आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्या. पोलिस व महसूल विभागाचा समन्वय चांगला असून येणाऱ्या काळातही सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले, महसूल विभागाचे महत्व आधिच्या काळापासून अधोरेखित झाले आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय हाताळणारा विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. त्यामुळे महसूल सप्ताह पुरते मर्यादीत न राहता पुर्णवेळ नागरिकांची कामे केली पाहीजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गातून अर्चना मोरे, तहसीलदार संवर्गातून सचिन कुमावत, नायब तहसीलदार संर्वगातून सुजाता उईके, राजेंद्र सयाम, बाळुताई भागवत, उदय पुंडलिक, मंडळ अधिकारी संवर्गातून ओमप्रकाश बाळस्कर, श्याम चंदनखेडे, रवि अंजारे, लघूलेखक ओंकार आमटे, अव्वल कारकून संवर्गातून मनिषा धानोरकर, विवेक मलकापुरे, चेतन खंडारे, अमोल आगलावे, तलाठी संवर्गातून गुणवंत कारमोरे, अमोल शंभरकर, सृष्टी बत्रा, उषा मरापे, महसूल सहाय्यक संवर्गातून सारीका पायघन, विनिता राठोड, अविनाश मानकर, नाजुका तिमांडे, तेजस्वनी चरडे, वाहन चालक संवर्गातून अनंत गंधे, संतोष जाधव, शिपाई संवर्गातून प्रफुल भोगे, प्रमोद पांडे, जनार्दन तराळे, दुर्गा गळहाट, कोतवाल संवर्गातून ज्ञानेश्वर चव्हाण, ई.पी. शेख, सुनिल इवनाते, पोलीस पाटील संवर्गातून चंद्रकांत गाखरे, प्रमोद महाजन तसेच लघूलेखक हरिष हाडके यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार (निवडणूक) अतुल रासपायले यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी मानले.





  Print






News - Wardha




Related Photos