महत्वाच्या बातम्या

 जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच देशोन्नती!


- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे गौरवोद्गार 

- दै. देशोन्नतीच्या जिल्हा कार्यालयाला दिली सदिच्छा भेट, मनस्विनी उपक्रमाचे केले कौतुक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : दै. देशोन्नती हे स्वतंत्र विचारांचे निर्भीड आणि निष्पक्ष व्यासपीठ असून या दैनिकाच्या माध्यमातून गेल्या १९ वर्षात जनसामान्यांचे अनेक प्रश्न सुटले आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी काढले.

ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील आरमोरी मार्गावरील दै. देशोन्नतीच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम - हलगेकर, आरमोरीचे माजी आमदार हरिराम वरखडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सतीश विधाते, जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा राकाँचे नेते नाना नाकाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, माजी प्रभारी जिल्हाध्यक्ष बबलू हकिम प्रामुख्याने उपस्थित होते.

ना. धर्मरावबाबा आत्राम पुढे म्हणाले की, आज दै. देशोन्नतीच्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सुरवातीपासूनच ग्रामीण वृत्त संकलनात अग्रेसर राहिलेल्या दैनिक देशोन्नतीने आत्तापर्यंत अनेक समस्यांना, प्रश्नांना वाचा फोडली आहे. यातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.शासन आणि  प्रशासनाला देशोन्नतीने मांडलेल्या समस्यांची दखल घ्यावी लागली, हे कौतुकास्पद आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने दै. देशोन्नतीने सुरू केलेला मनस्विनी उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून स्थानिक महिलांनी यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात दै. देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी तथा आवृत्ती प्रमुख प्रा. अनिल धामोडे यांनी ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत करून त्यांनी दै. देशोन्नतीची गेल्या १९ वर्षातील वाटचाल विशद केली. सोबतच महिलांसाठी स्वतंत्र विचारांचे व्यासपीठ म्हणून मनस्विनी हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमातून जिल्हाभरातील महिलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी लेखणाचे तसेच सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यातून महिला सक्षमीकरण घडून येईल, असा विश्वास त्यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.

यादरम्यान दै. देशोन्नतीने प्रकाशित केलेल्या मनस्विनी विशेषांकाचे तसेच वर्धापन दिन पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. संध्या येलेकर, तर आभार प्रा. डॉ. विना जंबेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनस्विनी मंच संयोजिका सुलभा धामोडे, कोअर कमिटी सदस्य गायत्री सोमनकर, मनीषा महात्मे  यांनी परिश्रम घेतले.

दै. देशोन्नतीने सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला : माजी. आ. हरिराम वरखडे

आजचे जग स्वार्थी आणि संधीसाधू झाले आहे. त्यात काही माध्यमांचाही समावेश आहे. मात्र दै. देशोन्नती याला अपवाद ठरले आहे. सत्ताकाळात कुणीही सोबतीला असतात. मात्र पडत्या काळात तेच साथ सोडून जातात. मात्र देशोन्नती याला अपवाद आहे. दै. देशोन्नतीने आजवर सामान्यांचा आवाज बुलंद केला आहे. शेतकरी, कष्टकरी, जनसामान्यांसह युवक आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम देशोन्नतीने केले आहे. त्यामुळे देशोन्नतीचा वाचकवर्ग खूप मोठा असून शहरी भागासोबतच ग्रामीण भागात हे वर्तमानपत्र लोकप्रिय असल्याचे विचार यावेळी आरमोरीचे माजी आ. हरिराम वरखडे यांनी मांडले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos