महत्वाच्या बातम्या

 भटक्या जमाती विरोधातही नोंदवला जाऊ शकतो अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा : राज्य सरकारची हायकोर्टात माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : भटक्या जमातीतील व्यक्तिविरोधातही अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

भटक्या जमातीतील व्यक्तीविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो की नाही? याची माहिती समाज कल्याण विभागाकडून मागवण्यात आली होती. त्यावर भटक्या जमातीतील व्यक्तीविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, असे समाज कल्याण विभागाने हायकोर्टात स्पष्ट केले आहे. राज्य सरकारतर्फे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाला ही माहिती देण्यात आली, त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी ११ ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

रायगड येथील रहिवासी चिन्मय खंडागळे विरोधात त्याच्याच पत्नीने बलात्कार, फसवणूक आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. या दोघांचा प्रेम विवाह झाला आहे आणि त्याची पत्नी अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. रायगड येथील रसायनी पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी खंडागळेने न्यायालयात याचिका केली आहे.

याचिकाकर्त्याचा दावा आहे की, आपण लोहार जातीचे आहोत. ९ मार्च २००६ रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार लोहार जात भटक्या जमातीत मोडते, त्यामुळे आपणच भटक्या जमातीतील असल्याने इथे ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. त्यावर हा मुद्दा महाराष्ट्रावर दुरोगामी परिणाम करणारा आहे. तेव्हा मागासवर्गीयाच्या तक्रारीनुसार भटक्या जमातीतील व्यक्तीविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवू शकतो की नाही? याची माहिती राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार अतिरिक्त सरकारी वकील गिता मुळेकर यांनी वरील माहिती न्यायालयात दिली.

खोट्या ॲट्रोसिटी गुन्ह्यात अडकवून खंडणीची मागणी केल्याने तरुणाची आत्महत्या -

खोट्या ॲट्रोसिटी गुन्ह्यात अडकवून खंडणीसाठी त्रास दिल्यानंतर, लग्नसुद्धा होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडीमधील तरुणाने १ जुलै रोजी आत्महत्या केली. महेश जाधव या २५ वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी आपल्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत गावचा सरंपच थेट आरोपी निघाला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मात्र, खोट्या ॲट्रोसिटीत अडकवणारे अजूनही मोकाट असल्याने गावकरी संतप्त झाले असून ते रस्त्यावर उतरले. त्यांनी गावात मोर्चा काढत झालेल्या घटनेचा निषेध करत मोकाटांवर तातडीने कारवाईची मागणी केली. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील सरपंच अंकुश ठोंबरेला पोलिसांनी अटक केली होती.





  Print






News - Rajy




Related Photos