अरुंद विहिरीतील गाळ उपसताना प्राणवायू अभावी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू


वृत्तसंस्था / लातूर : अरुंद विहिरीत गाळ काढण्यासाठी उतरल्यानंतर प्राणवायू (ऑक्सिजन) अभावी गुदमरुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाल्याची घटना   औसा तालुक्यातील  आलमला गावात घडली. गावकऱ्यांनी पोलीस व अग्निशामक दलाच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या हालरच्या पंख्याने विहिरीत हवा सोडून केलेल्या मदतकार्यामुळे सुदैवाने चौघे बचावले. मृत्यू पावलेले एकाच कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सद्दाम मुलानी, सय्यद मुलानी व फारुक मुलानी अशी मृतकांची नावे आहेत. 
आलमला गावातील  धोतरपट्टी भागात एका विहिरीत सिमेंटच्या नळ्या एकावर एक उभारुन छोटासा आड करुन त्यात पाणबुडी वीज पंप टाकून परिसरातील लोक तहान भागवत होते. मात्र या अरुंद आडात गाळ व कचरा असल्याने व तो पाणबुडीला अडकत असल्याने काढावा, यासाठी सद्दाम फारुख मुलानी (२५) हा तरुण उतरला. मात्र त्याची हालचाल थांबल्याने त्याचा चुलत भाऊ सय्यद दाऊत (राजू) मुलानी (३०) हा उतरला. मात्र त्याचीही तीच अवस्था झाल्याने दोघे गाळात अडकले की काय, असे समजून मदतीसाठी फारुख खुदबोद्दीन मुलानी (५२) हे उतरले. मात्र त्यांचीही हालचाल थांबली. त्यांच्या मदतीसाठी म्हणून सुशांत महिशंकर बिराजदार (२४), शाहीद कमाल मुलानी (२६) व योगेश उमाशंकर हुरदळे (२६), मल्लिनाथ बसवेश्वर अंबुलगे (२६) हे उतरले. मात्र अर्ध्यात गेल्यानंतर त्यांनाही गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने एका ट्रॅक्टर हालरच्या पंख्याची हवा निर्माण करुन अग्निशामक दलाच्या व पोलिसांच्या सहाय्याने ग्रामस्थांनी सर्वांनाच वर काढले.
दरम्यान मुलानी कुटुंबातील तिघे बेशुद्धावस्थेतच असल्याने त्यांच्यासह सर्वांना तातडीने औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सद्दाम मुलानी, सय्यद मुलानी व फारुक मुलानी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-29


Related Photos