येनापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सलाईनवर, अनेक महिन्यांपासून कारभार प्रभारींवर


- वाढत्या उकाड्यात हैराण रुग्णांना खाजगी रुग्णालयात धावण्याची पाळी
- समस्या सोडवाव्यात , अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / येनापूर : 
 चामोर्शी तालुक्यातील जवळपास २५ ते ३० गावांतील रुग्णांना प्राथमिक उपचाराची सोया मिळावी म्हणून निर्माण केलेल्या येनापूर येथिल  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा च सलाईन वर असल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.  ग्रामीण भागात गंभीर प्रकारच्या आजारांचा सामना करताना रुग्णांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.  येनापूर  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रभारी अधिकारीसुद्धा वेळेवर सेवा देत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत. तसेच या रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी हे पद सुद्धा रिक्त आहे. 
येनापूर आणि परिसरातील अनेक गावात  वेगवेगळ्या आजारांनी पाय पसरले आहे. प्रारंभी सर्दी, खोकला, ताप या पासून सुरू होणाऱ्या आजारांमुळे पांढऱ्या पेशी कमी होणे, डेंग्यु, ताप, चिकुनगुनीया यासह स्वाईन फ्ल्यु सारख्या आजारांची लागत होत असल्याचे विदारक चित्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या आजारांबाबत कोणत्याही प्रकारची विशेष उपाययोजना केली जात असल्याचे दिसुन येत नाही.  ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध उपकेंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू आहे. मात्र चामोर्शी  तालुक्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये विविध महत्त्वाची पदे रिक्त असून शासनाकडून म्हणावा तसा औषधाचा पुरवठाही केला जात नाही. दरम्यान पुर्वीच सलाईनवर असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या बिघडलेल्या स्वास्थ्य अवस्थेला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळत आहे.
दुसरीकडे शासकीय आरोग्य यंत्रणा कमकुवत असल्याने आजारांचे निदान करण्यासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याखेरीज पर्याय नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी पाहता रक्त, लघवी तपासणीच्या नावाखाली वाटेल तेवढी फी अकारणी केली जात आहे. उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून भरमसाठ पैशाची लूट होत असल्याचे चित्र आहे.
परिसरातील  बहुतांश भागाला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असताना  प्रशासनाने स्वच्छता व औषध फवारणी मोहीम हाती घेतली पाहिजे. दरम्यान रुग्णांकडून उपचार दराबाबत विचारपूस केल्यास सरळपणे रुग्णालयाच्या बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याने आजाराने त्रस्त रुग्णांच्या मानसिक त्रासात भर घालण्याचा प्रकारही  घडला असल्याचे चित्र आहे.येनापूर येथे गेली चार महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त असल्याने हे उपकेंद्र रामभरोसे आहे. तसेच कोणसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस अधिकाऱ्याची जागासुद्धा रिक्त आहे. यामुळे रुग्णांना आष्टी, चामोर्शी येथे किंवा खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्वरित रिक्त जागा भरुण दवाखान्यात औषध साठा उपलब्ध करुण द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा  माजी सरपंच निलकंठ निखाडे , नितीन खिरटकर, संदीप तिमाडे, निनाद देठेकर, विस्तारी बोमकंटीवार,  प्रकाश बोडावार, वसंत दंडिकेवार, विजय जक्कुलवार यांनी दिला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-29


Related Photos