सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने केले विष प्राशन, पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती :
  बेकायदा सावकाराच्या जाचाला कंटाळून वरूड तालुक्यातील चिंचारगव्हाण (पुनर्वसन) येथील शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन केले. या दाम्पत्यापैकी पतीचा मृत्यू झाला तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने गावात संतापाचे वातावरण असून बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सोपान गंगाधर शेलोटे (३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे, तर त्याची पत्नी वंदना शेलोटे (३२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे दांपत्य २५ एप्रिल रोजी लग्नसमारंभासाठी घरातून निघाले. सुरळी गावात येताच दोघांनीही विष प्राशन केले. त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु २७ एप्रिलच्या मध्यरात्री सोपान यांचा मृत्यू झाला. वंदना यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोपान यांच्यावर सावकारी कर्ज असून त्याने परतफेडीचा तगादा लावल्यानेच या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. सोपान घरातील कर्ता पुरुष होता. त्याच्या मृत्यूने त्याचे वृद्ध आई-वडील आणि दोन मुले पोरकी झाली आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-29


Related Photos