महत्वाच्या बातम्या

 वर्षभरात चंद्रपूर परिमंडलात १७ लाख ग्राहकांकडून तब्बल ४२४ कोटींचा ऑनलाइन वीजबिल भरणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलामध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरामध्ये १६ लाख ७६ हजार ९३८ वीजग्राहकांनी तब्बल ४२४ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ऑनलाइन भरणा केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२ लाख ३१ हजार ग्राहकांनी ३३३ कोटी रुपयांचा तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ लाख ४५ हजार ८७० ग्राहकांनी ६६ कोटी १८ लाख रुपयांचा घरबसल्या ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केला आहे.

गेल्या जुलै २०२२ ते जुलै २०२३ च्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत चंद्रपूर परिमंडलामध्ये वीजबिलांपोटी दरमहा १ लाख ३९ हजार वीजग्राहक ३५ कोटी ५५ लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा करीत आहे. चंद्रपूर परिमंडलामध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ग्राहकांची पसंती वाढत आहे. ऑनलाइन भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेला व ऑनलाइन वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.

महावितरणकडून बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाइन द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ऑनलाइन भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. ऑनलाइन वीजबिल भरणा केल्यानंतर संबंधीत ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे पोच देण्यात येत आहे.

लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच वीजबिलांचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास एक टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. सोबतच लघुदाब ग्राहकांचे वीजबिल ५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे. तसेच विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून महावितरणचे वीजबिल रोखीन भरण्यासाठी ५ हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल सुरक्षित व घरबसल्या भरण्यासाठी महावितरणची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे.

- महावितरणचे महापॉवर वालेट आता किराणा दुकान, मेडिकल मध्येही वीजबिल भरता येईल

याव्यतिरिक्त वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडीकल व जनरल स्टोअर्स चालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रतीबिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळणार आहे.

वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्या पतसंस्थांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र (शॉप ॲक्ट), पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर बिल भरणा झाल्याचा एसएमएस पाठविण्यात येईल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. त्याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल.





  Print






News - Chandrapur




Related Photos