गडचिरोली आगाराचे गचाळ नियोजन, प्रवाशांना फटका


- चालक - वाहकांनाही माहिती नसते जायचे कुठे?
- चौकशी कक्षातील कर्मचारी करतात वेळ मारून नेण्याचे काम
- अनेक बसेसचा ‘भरवसा नाही’ असेच उत्तर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्य परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालयाचे आगार असलेल्या गडचिरोली आगारात बसेस सोडण्याचे नियोजनच योग्य नसल्याने गचाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. तासन् तास वाट पाहूनही वेळेवर बस सोडली जात नसल्याने प्रवाशांना उन्हा - तान्हात इकडून तिकडे, तिकडून इकडे चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून बोगस सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली आगारातील चैकशी कक्षात एकाच बसच्या सुटण्याची वेगवेगळी वेळ सांगितली जाते. एका बसबाबत चौकशी केली असता आधी १२.३०  ची वेळ सांगण्यात आली. प्रत्यक्षात त्या वेळेवर बसच सोडण्यात आली नाही. यानंतर चौकशी केली असता १.१५ ची वेळ देण्यात आली. या वेळीही बस सोडण्यात आली नाही. परत विचारणा केली असता सदर बस १.३०  वाजता सुटेल असे सांगण्यात आले. मात्र वेळ गेल्यानंतरही बस आगारात लावण्यात आली नाही. यामुळे प्रवासी आलेल्या - गेलेल्या प्रत्येक बसकडे टक लावून बघत होते. 
अनेक बसेसला कोणत्या गावी जाणार आहे याची पाटीच लावलेली नसते. यामुळे सावली शोधून बसलेल्या प्रवाशांना उठून चालक - वाहकांना विचारणा करण्यासाठी उन्हात धाव घ्यावी लागत आहे. काही बसेसबाबत विचारणा केली असता जाणार की नाही याबाबत ‘भरवसा नाही’ असे उत्तर देण्यात आले. यामुळे रोजच्या वेळेवर सुटणाऱ्या बसचे नियोजनच होत नसेल तर प्रवाशांनी जायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच चालक बस आणून उभी करतात. बसला फलक लावलेला नसतो. अशावेळी प्रवाशांनी विचारणा केल्यास बस कुठे जाणार हे अजून आम्हालाच माहिती नाही, असे उत्तर चालकाकडून मिळत आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या बोगस कारभारामुळे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत.  बसस्थानकाचे काम सुरु असल्यामुळे बसेस अस्ताव्यस्त लावल्या जातात. यामुळे प्रवाशांना नेमकी आपली बस कुठे लागली हे शोधण्यातच बराच वेळ लागतो. प्रसंगी बस सूटूनही जाते. यामुळे प्रवाशांना नाहक ताटकळत रहावे लागते.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-28


Related Photos