महत्वाच्या बातम्या

 शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास घ्यावा : अपर आयुक्त रवींद्र ठाकरे


- आश्रमशाळा शिक्षकांचे गुणवत्ता विकास प्रशिक्षण

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकांच्या हाती असून हे करत असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांवर मनापासून व मातृहृदयी प्रेमाने संस्कार करावे. भविष्यवेधी शिक्षण उपक्रमाचा उपयोग करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास घ्यावा. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करून एकविसाव्या शतकातील आव्हानाला सामोरे जाणारे व जागतिक दर्जाची स्वीकार्यता असणारे विद्यार्थी निर्माण करावे, असे आवाहन आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने शुक्रवार ४ आगस्ट रोजी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली येथे प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे तसेच अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचे एक दिवसीय शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रशिक्षणाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, अनिल सोमनकर, प्रभू सादमवार, अमोघ सहजे आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत भविष्यवेधी शिक्षण उपक्रम सुरू आहे. हा उपक्रम नियोजनबद्ध व योग्य पद्धतीने राबवण्यासाठी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे अथक परिश्रम घेत असून या उपक्रमाचा मागीलवर्षीचा आढावा घेण्यासाठी व शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये अधिक जोमाने व नवचैतन्याने हा उपक्रम राबविण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणास गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक व १५ अनुदानित आश्रमशाळेतील  मुख्याध्यापकांचा समावेश करण्यात आला.

भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या असून मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे ,मुलांना शिकण्यास आव्हान देणे, विषय मित्र तयार करणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, एक तृतीयांश वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणे, मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे या पायऱ्यांचा यात समावेश आहे.

आश्रमशाळेतील कमी व मध्यम गतीतील आदिवासी विद्यार्थ्यांना जास्त गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीत आणण्याची काळाची गरज असल्याची जाणीव या प्रशिक्षणात सर्व शिक्षकांना करून देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी भविष्यवेधी शिक्षणासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.

संचालन प्राथमिक शिक्षिका प्रतिभा बनाईत यांनी केले. मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पातील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos