राज्याच्या काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार


वृत्तसंस्था / पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या तापमानाने राज्याला सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी हैराण केले. कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये ४६.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सर्वाधिक किमान तापमानाची कोल्हापूरमध्ये २५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
वातावरणातील बदलांमुळे शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा आता असह्य होत आहे. शनिवारीही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नगर जिल्ह्यामध्ये ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
२८ एप्रिल रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान वाढणार, रात्री आकाश अंशत: ढगाळ राहणार.
२९ एप्रिल रोजी विदर्भात, मराठवाडा आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता, दुपारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता.
३० एप्रिल आणि १ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, पुण्यात कमाल तापमानात किंचित घट होणार, आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
अकोला ४६.७
चंद्रपूर ४६.५
वर्धा ४६
अमरावती ४६
जळगाव ४५
नागपूर ४५.३
बीड ४४.४
उस्मानाबाद ४३.६
औरंगाबाद ४३.६
सोलापूर ४३.१
पुणे ४२.९
लोहगाव ४२.५
सातारा ४१.५
कोल्हापूर ३९.९
News - Rajy | Posted : 2019-04-28