मृत नक्षली रामको नरोटे हिच्यावर होते १६ लाखांचे बक्षिस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज २७  एप्रिल रोजी दुपारी १२  ते १ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही ते फुलणार जंगल परिसरात सी - ६०  चे जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये दोन महिला नक्षली ठार झाल्या आहेत. यापैकी रामको उर्फ कमला मनकु नरोटे हिच्यावर १६  लाखांचे बक्षिस होते. दुसरी महिला नक्षली शिल्पा दुर्वा हिच्यावर ४ लाखांचे बक्षिस होते.
रामको उर्फ कमला मनकु नरोटे (४६)  ही गट्टा दलममध्ये डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. तिचा भामरागड व गट्टा जंगल परिसरात पोलिसांविरोधी घातपाताच्या दृष्टीने केलेल्या अनेक कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असल्याने तिच्या खात्म्यामुळे गडचिरोली पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे.
शिल्पा उर्फ कोटे उर्फ मनु दसरू दुर्वा (२९)  ही भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर चार लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. 
२२  आणि २३  एप्रिल २०१८  रोजी गडचिरोली पोलिसांनी ४०  नक्षल्यांचा खात्मा केला होता. यामुळे नक्षल्यांनी २२  ते २८  एप्रिलदरम्यान दुर्गम गावांमध्ये पत्रके वाटून बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे. आज दुपारी १२  ते १ वाजताच्या दरम्यान नक्षल्यांनी पोलिसांना जिवे मारण्याच्या हेतूने भुसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. यानंतर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांना सडेतोड उत्तर दिले. यानंतर नक्षली पळून गेले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-27


Related Photos