विद्युत शाॅक लागून ठाणेगाव येथील युवक ठार, तिघे जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी:
आरमोरी - गडचिरोली दरम्यान ३३ केव्ही   विद्यूत जोडणीचे काम करीत असताना किटाळी जवळ विद्युत शाॅक लागल्याने ठाणेगाव येथील एक युवक ठार झाला तर तिघे जण जखमी झााल्याची घटना आज २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
सुनिल दादाजी नैताम (३८) रा. ठाणेगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. या घटनेत सचिन विश्वनाथ चलाख, गणेश रामभाऊ नैताम दोघेही रा. ठाणेगाव आणि सुरेश उसेंडी रा. कोरेगाव रांगी हे तिघेजण जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ठाणेगाव येथील मजूर ३३ केव्ही विद्युत  जोडणीचे काम करीत होते. खड्ड्यामध्ये खांब टाकत असताना लोखंडी खांबाचा वर असलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाला. यामुळे शाॅक लागला. यामध्ये चौघे जण जखमी झाले. जखमींना आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले . यापैकी  सुनिल नैताम याचा वाटेचत मृत्यू झाला. सध्या दोन जखमींवर आरमोरी येथे तर एका गंभीर जखमीवर ब्रम्हपुरी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. त्याच्या मागे पत्नी, आई, वडील, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-27


Related Photos