लोकसभा निवडणूकीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ : विखे पाटील


वृत्तसंस्था / नगर :  “नगरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी मी वैयक्तिक आणि पक्षातर्फे शरद पवार यांना विनंती केली होती. मात्र, आमच्याच पक्षातील काही नेते याला विरोध करीत होते”, असा खळबळजनक आरोप विखे यांनी केला आहे. ही निवडणूक व्यक्तीगत पातळीवर आणल्यामुळे मला नाइलाजाने सुजयचा प्रचार करण्याची वेळ आली असे म्हणत, अद्याप राजकीय भूमिका ठरवलेली नाही, लोकसभा निवडणूकीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये नगरच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरच्या जागेवरून झालेल्या वादात आमच्याच पक्षाचे नेते राष्ट्रवादीकडून उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न करत होते असा आरोप विखे यांनी केला आहे. गेल्या साडेचार वर्षांत पक्षाने दिलेली विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेतून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीचा विषय लावून धरल्यामुळे त्याचा फायदा जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला झाल्याचे विखे म्हणाले. तसेच विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा मंजूर केल्याचे दु:ख नसल्याचे सांगून उलट मला साडेचार वर्षे संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. यापुढे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर काम करणार असून वडिलांचे अर्धे राहिलेले काम पुढे नेणार असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-27


Related Photos