लोहारा येथे वन तलावात बुडून २ मुलांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  शहरालगतच्या लोहारा गावाशेजारी असलेल्या वन तलावात बुडून  २ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २६ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस  आली आहे. अंशु घनश्याम कोडापे आणि रितीक प्रकाश मेश्राम अशी मृत मुलांची नावे आहेत. 
अंशु  आणि रितीक  कालपासून   बेपत्ता होते. दोघांचाही काल रात्रीपासून ग्रामस्थांकडून शोध घेतला जात होता. रात्री उशिरा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांनी  निष्काळजीपणा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 
दरम्यान, आज सकाळी परत जंगलात शोध मोहीम राबविली असता तलावातील पाण्यात दोघांचे मृतदेह तरंगताना आढळले . यावेळी पालकांनी एकच हंबरडा फोडला.  या वन तलावाशेजारी खूप मोठ्या संख्येत वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे तलावात ग्रामस्थ आंघोळीसाठी क्वचित जातात. त्यातच ही मुले इथे कशी पोचली आणि तलावात कशी गेली, याबाबत तर्क लढविले जात आहेत. दरम्यान रामनगर पोलिसांचे पथक   घटनास्थळी पोचत या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-26


Related Photos