मुंबई पोलिसांच्या पसंतीस उतरलेली 'बेसबॉल कॅप' दिसणार आता महाराष्ट्रातील पोलिसांच्या डोक्यावर


वृत्तसंस्था / मुंबई :  टोपीऐवजी मुंबई पोलिसांच्या पसंतीस उतरलेली 'बेसबॉल कॅप'  आता राज्यातील    पोलिसांच्या डोक्यावर दिसणार आहे. बंदोबस्त, दंगल, आंदोलनप्रसंगी सतत डोक्यावरून घसरत असल्यानेच  'बेसबॉल कॅप'  चा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.  यामुळे आता 'बेसबॉल' खेळात वापरल्या जाणाऱ्या टोपीचा 'अतिरिक्त टोपी' म्हणून पोलिस गणवेशात समावेश करण्यात आला आहे. ही आधुनिक कॅप काळ्या रंगाची आहे. त्यावर एका बाजूला मराठीत तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये 'महाराष्ट्र पोलिस' असे लिहिण्यात आले आहे. दर्शनी बाजूला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो पिवळ्या रंगात आहे. कॅपच्या पुढील भागात लाल पट्टा असल्याने ही रंगसंगती आकर्षक दिसते. 
 डोक्यावरील टोपी घट्ट बसत नसल्याने ती डोक्यावरून वारंवार घसरते . याविषयीच्या तक्रारी  पोलिस वर्तुळात करण्यात येत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही याबाबत दाद मागण्यात आली होती. त्याची दखल घेत मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिस दलात प्रत्येकाच्या डोक्यावर घट्ट बसणारी व बदलत्या काळानुसार आवश्यक अशा कॅपचा पर्याय स्वीकारला. या कॅपबाबत मुंबई पोलिसांनी समाधान व्यक्त केल्याने आता हाच प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतला आहे. 
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दैंनदिन कामाच्या तसेच बंदोबस्ताच्या धावपळीतही ही कॅप डोक्यावर घट्ट बसते. कॅपमुळे उन्हापासून चेहऱ्याचेही संरक्षण होते. पोलिस कॉन्स्टेबल ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलिसांना लवकरात लवकर 'बेसबॉल कॅप' उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश सुबोध जयस्वाल यांनी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

   Print


News - Rajy | Posted : 2019-04-26


Related Photos