माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामिनाला पोलिसांचा विरोध


वृत्तसंस्था / पुणे :   माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले वरवरा राव यांनी भावाच्या पत्नीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी  केली आहे. मात्र त्यांना जामीन दिल्यास ते भूमिगत होण्याची शक्यता  व्यक्त करीत  त्यांच्या या जमीन  अर्जाला पोलिसांनी विरोध केला आहे.  त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळण्यात यावा असा लेखी युक्तिवाद कोर्टात दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. 
वरवरा राव हे सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या भावजयीचे सोमवारी निधन झाल्याची माहिती त्यांना कळली. घरात आता राव मोठे आहेत. निधनानंतरच्या धार्मिक विधींसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित असणे गरजेचे असल्याने त्यांनी २९ एप्रिल ते चार मे या कालावधीत तात्पुरता जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला आहे.  या अर्जावर सरकारी पक्षाला तसेच पोलिसांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी म्हणणे सादर केले. राव यांचा अर्ज मान्य केल्यास गुन्ह्यातील उपलब्ध पुरावा ते नष्ट करण्याची शक्यता आहे. धार्मिक विधीसाठी नातेवाइक, मित्र परिवार तसेच तेथील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या माओवादी कारवाया पाहता राव यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना तेथील सर्वच व्यक्ती अपरिचित असतील. पोलिसांवर हल्ला होऊन राव यांना पळून जाण्यास माओवादी मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माओवाद्यांचा हेतू साध्य होईल, असे म्हणणे पोलिसांनी मांडले. राव यांच्यातर्फे अ‍ॅड. राहुल देशमुख आणि अ‍ॅड. पार्थ शहा यांनी अर्ज दाखल केला आहे. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-04-26


Related Photos