वयाच्या एक वर्षाच्या आधी मुलांना टीव्ही, मोबाइलसारख्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनशी ओळखच करून देणे घातक


- जागतिक आरोग्य संघटनेने केली शिफारस 
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्र : 
लहान मुलांच्या हातात थेट मोबाईल देणाऱ्या पालकांसाठी अत्यंत महत्वाच्या शिफारशी जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच केल्या आहेत. वयाच्या एक वर्षाच्या आधी मुलांना टीव्ही, मोबाइल यांसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्क्रीनशी ओळखच करून देऊ नये, अशा स्पष्ट सूचना संघटनेने दिल्या आहेत.  एक ते पाच वर्षांदरम्यान वयाच्या मुलांनाही दिवसातून एका तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही-मोबाइल बघण्यास देऊ नये, असेही या सूचनांमध्ये म्हटले आहे. 
जागतिक पातळीवर सध्या सहा टक्के म्हणजेच, ४ कोटी बालके लठ्ठ आहेत. त्यातील निम्मी आफ्रिका व आशियात आहेत. मुलांच्या शारीरिक हालचाली तसेच बौद्धिक विकास वयाच्या पहिल्या पाच वर्षांतच होत असल्याने जडणघडणीच्या दृष्टीने या महत्त्वपूर्ण कालावधीतच त्यांना आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीच्या चांगल्या सवयी विकसित करणे आवश्यक असते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने पाच वर्षांखालील मुलांसाठी प्रथमच अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. 
जागतिक आरोग्य संघटनेच्या या सूचनांनुसार, पाच वर्षांखालील मुलांचा स्क्रीन-टाइम कमीत कमी असावा, बाबागाडी वा खुर्चीत ठेवण्याचा कालावधीही मर्यादित असावा, त्यांना पुरेशी, शांत झोप मिळावी तसेच खेळ व हालचालींसाठी अधिक वेळ असावा. 
चालत किंवा सायकलऐवजी वाहनांचा वापर, शाळेत बाकावर बसून राहणे, टीव्ही पाहणे, बसल्याबसल्या स्क्रीनवर खेळण्याचे खेळ यांचे प्रमाण वाढत असून त्याचा संबंध आरोग्याच्या तक्रारींशी जोडलेला आहे, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये बालकांच्या स्क्रीन-टाइममध्ये कार्टून बघण्यासारख्या बैठ्या कृतीचा समावेश करण्यात आला आहे. आजोबा-आजींशी ऑनलाइन बोलण्यासारख्या कृतीचा यात समावेश करण्यात आलेला नाही.    Print


News - World | Posted : 2019-04-26


Related Photos