महत्वाच्या बातम्या

 जिल्हा महिला बालविकास विभागाचा अनाथांना आधार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा महिला व बालविकास विभागाने कोरोना काळात अनाथ व एक पालक बालकांना आर्थिक सहाय्य दिले आहे. अनाथ झालेल्या ८६  बालकांना महिला व बालविकास विभागाकडून ५ लक्ष मुदत ठेव लाभ मिळाला आहे. तसेच पीएम केअर्स फंडकडून १०  लक्ष रुपयांचा लाभ ८२  बालकांना मिळाला आहे.  

दोन्ही पालक गमावलेल्या ८६ बालकांपैकी ५३ बालकांचे वारसा प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत.
कोविड- १९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक आणि एक पालक गमावलेल्या अनाथ बालकांची कौटुंबिक व आर्थिक हानी झाली असून त्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता निर्माण झाली. या बालकांची भावनिक आणि वैयक्तिक हानी भरून निघणे सर्वथा अशक्य आहे. या बालकांचे शिक्षण व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होईपर्यंतचे आयुष्य सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत काही योजना या बालकांसाठी राबविण्यात येत आहेत. नागपूर   जिल्ह्यात आजपर्यंत पूर्णतः अनाथ झालेल्या ८६ (४५ मुले आणि ४१ मुली) बालकांची नोंदणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये झाली असून आहे. सर्वच ८६ बालकांना राज्य शासनामार्फत ५ लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. पुर्णतः अनाथ झालेली ६ बालके बालगृहात दाखल करण्यात आलेली असून त्यांना त्यांची काळजी व संरक्षण तसेच शिक्षण, प्रशिक्षणाव्दारे पुनर्वसन करण्यात येत आहे.

८६ बालकांपैकी ८० अनाथ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या ८४ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या  पी.एम. केअर अंतर्गत ८२ कोविड अनाथ बालकांना १० लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र आणि आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड वितरण करण्यात आलेले आहे. उर्वरीत ४ बालकांबाबत पी.एम. केअर चा निधी मिळण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
कोविडमुळे अनाथ बालकांची मोठी समस्या संपूर्ण देशातच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ही एक सामाजिक समस्या बनत आहे. मात्र, अशा अनाथ बालकांचे पालन, पोषण, संरक्षण, शिक्षण आदी संपूर्ण जबाबदारी घेण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी महिला व बालविकास विभागाने घेतलेली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos