महत्वाच्या बातम्या

 विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील नियमित लसीकरणापासून वंचित / पात्र बालकांचे व गरोदर माता यांचे लसीकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : बालकांमधिल मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की,अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. त्याचप्रमाणे केन्द्रशासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रुबेला आजाराचे दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे.

यासाठी केन्द्रशासनाने माहे ऑगष्ट २०२३ पासून ३ फेऱ्यांमध्ये राज्यभरात " विशेष मिशन इंद्रधनुष ५.० " ही मोहिम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हयामध्ये " विशेष मिशन इंद्रधनुष ५.०" या मोहिमेची पहिली फेरी ०७ ते १२ ऑगष्ट २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. " विशेष मिशन इंद्रधनुष 5.0" मोहिमेचे नियोजन करण्याकरीता मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली २१ जुलै २०२३ रोजी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा घेण्यात आली. 

त्याचप्रमाणे जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केन्दांचे वैद्यकिय अधिकारी यांचे "विशेष मिशन इंद्रधनुष ऑगष्ट ५.० " व U-Win बाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आले. सदर मोहिमे दरम्यान जिल्हयातील ० ते १ वर्ष वयोगटातील १५९०, १ ते २ वर्ष वयोगटातील १२६४ तर २ ते ५ या वर्षवयोगटातील ३०२ बालकांना तसेच ५७२  गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

"विशेष मिशन इंद्रधनुष ५.० " हया मोहिमेचे अहवाल U-Win या App मध्ये नोंदविण्यात येणार असून सदर मोहिमेनंतर करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे संपूर्ण अहवाल U-Win या App वर नोंदवावयाचे आहे. "विशेष मिशन इंद्रधनुष ५.०" ही मोहिम गडचिरोली जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून सदर मोहिमेमध्ये सर्वांनी आपल्या बालकांचे व गरोदर माता यांचे संपूर्ण लसीकरण करुन घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले.

याप्रसंगी डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली तसेच डॉ. स्वप्निल बेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली हे उपस्थित होते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.






  Print






News - Gadchiroli




Related Photos