महिला व बाल रूग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर दगावली महिला


- नातेवाईकांची पोलिसांत तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्यातील गरोदर महिला व बालकांवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले महिला व बाल रूग्णालय सुरूवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आहे. आता रूग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी  उपचाराप्रसंगी उध्दट वागणूक दिली तसेच उपचारात हयगय केल्यामुळे गरोदर महिला दगावल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 
प्राप्त माहितीनुसार एटापल्ली तालुक्यातील वट्टेगट्टा येथील प्रिया सुधाकर पुडो या गरोदर महिलेला २३  एप्रिल रोजी ९ वाजताच्या सुमारास महिला व बाल रूग्णालयात भरती करण्यात आले होते. रूग्ण महिलेची संपूर्ण तपासणी केली साधारण होते. रात्री ११  वाजता प्रसुती कळा सुरू झाल्या. महिलेला मुलगी जन्माला आली. यावेळीही रूग्ण महिला सुस्थितीत होती, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.   महिलेला प्रसुती कळा येत असताना कर्तव्यावर असलेली एक परिचारीका, शिपाई व पुरूष वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिचारीका आणि शिपायाने सदर रूग्ण महिलेला नाटक करते, अशा पेशंटला हकलून द्यावे, असे बोलून उध्दटपणे व्यवहार केला. तिच्या गालावर तसेच मांडीवर थापड मारली. यानंतर काल २४  एप्रिल रोजी रात्री १२.३०  ते १ वाजताच्या दरम्यान तिच्या प्रसुती मार्गातून रक्तप्रवाह सुरू झाला. यावेळी रूग्ण तडफडू लागली. 
प्रिया पुडो ही सिकलसेलग्रस्त रूग्ण होती. असे असतानाही तिच्यावर कोणताही औषधोपचार केला नाही. प्रसुती झाल्यानंतर परिचारीका व शिपाई पैशांची मागणी करीत होते. परंतु पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात परिचारीका, शिपाई आणि डाॅक्टरांनी रूग्णाकडे दूर्लक्ष केले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 
प्रसुतीच्या मार्गातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रिया पुडो ही बेशुध्द पडली. यानंतर महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  तिची तपासणी केली. यावेळी त्यांनी रूग्णाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार का केले नाही, असे कर्तव्यावरील परिचारीकेस विचारणा केली. परंतु परिचारीकेने कोणतेही उत्तर दिले नाही. रूग्ण कोणताही प्रतिसाद देत नव्हती. यावेळी नातेवाईकांना कक्षाच्या बाहेर काढण्यात आले. दार बंद करून तपासणी केल्यानंतर पाच मिनीटांतच रूग्णाला स्ट्रेचरवर टाकून बाहेर काढण्यात आले. रूग्णाला तत्काळ चंद्रपूर येथे हलवायचे आहे असे सांगून स्वतःच ॲम्बुलन्सपर्यंत घेवून गेले. यावेळी रूग्णाला स्ट्रेचरवरून खाली पाडल्याचा आरोपही नातेवाईकांनी तक्रारीत केला आहे. 
ॲम्बुलन्सने रूग्णाला घेवून चंद्रपूर येथे पहाटे ३.५५  वाजता पोहचले असता तेथील डाॅक्टरांनी तपासणी केली. यावेळी डाॅक्टरांनी सदर रूग्णाचा ३ तासांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेवून परत महिला व बाल रूग्णालय गाठले. सध्या मृतक महिलेचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रीया सुरू असून यानंतरच नेमके मृत्यूचे कारण कळू शकेल.
प्रिया पुडो हिच्या मृत्यूला रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व शिपाई हेच जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी   पती सुधाकर पुडो, कमल ठाकरे, निर्मला उसेंडी, जनाबाई हेडो यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

कर्तव्यात कोणतीही कसूर केली नाही, आरोप चुकीचे : डाॅ. सोयाम

या प्रकरणाबाबत रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. दीपचंद सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी  कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचे म्हटले आहे. महिलेची दुसरी प्रसूती होती. तिला  सिकलसेल होते आणि   बाळ जन्मास आल्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण झाली. सध्या  बाळावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. सिकलसेल असल्याने आणि रक्तस्त्रावामुळे रूग्णाची प्रकृती खालावली. यामुळे तिचा मृत्यू झाला. सध्या शवविच्छेदन सुरू असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असेही डाॅ. सोयाम म्हणाले.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-24


Related Photos