महत्वाच्या बातम्या

 तरुणांसाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा


- युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

- नवसंकल्पनांना मिळणार बीज भांडवल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करणे हे या चॅलेंजचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील तरुणांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाही होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात संस्थेची, महाविद्यालयाची नोंदणी करून संस्था, महाविद्यालय स्तरावर संकल्पनांची निवड केल्या जाईल. यात विद्यार्थ्यांकडून अर्जाची मागणी, संस्था स्तरावर सादरीकरण व प्रत्येक संस्थेतील दोन सर्वोत्कृष्ट संकल्पनांची निवड प्रक्रिया पार पडल्या जाईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड करण्यात येईल. यात जिल्हास्तरावर उत्तम १०० संकल्पनांची सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल तसेच या संकल्पनांची प्रशिक्षण कार्यशाळा, संकल्पनांचे जिल्हास्तरावर सादरीकरण होईल. त्यानंतर जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ठ १० विजेत्यांची निवड करून त्यांना शासनामार्फत १ लाख रुपयांचे बीज भांडवल दिल्या जाईल.

तिसऱ्या टप्प्यात विशेष इनक्युबेशन प्रोग्रामचे आयोजन करण्यात येईल. यात प्रत्येक जिल्ह्यातील १० अशा ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इनक्युबेशन प्रोग्राम, या प्रोग्रामनंतर ३६० संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण होईल व यातील उत्तम पाच विजेत्यांना शासनामार्फत ५ लाखांचे बीज भांडवल देण्यात येतील. या स्पर्धेसाठी पदवी, पदव्युत्तर, पदविकेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी तसेच जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह भाग घेऊ शकतील.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी सर्व महाविद्यालय, व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी १५ जुलै ते १५ ऑगस्ट पर्यंत तसेच विद्यार्थ्यांनी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत https://schemes.msins.in/ या पोर्टल वर नोंदणी करावी. प्रत्येक शैक्षणिक संस्था सहभागी उमेदवारांसाठी सादरीकरण सत्र आयोजित करेल. या सत्रामध्ये जुरी म्हणून संबंधित शैक्षणिक संस्थेतील उद्योजकता विषय पाहणारे शिक्षक/प्राध्यापक किंवा संस्थेने निर्देशित केलेली व्यक्ती काम पाहतील. https://schemes.msins.in/ या पोर्टलवर मुल्यांकन निकष संस्थांना दिलेले असून यासाठी प्रत्येक संस्थेला युजर आईडी व पासवर्ड शासनाकडून दिल्या जाणार आहे.

संस्थांनी १० सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांडून प्राप्त अर्जांची छाननी करून सादरीकरण घ्यावे. छाननी व सादरीकरणानंतर २३ सप्टेंबर रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या आधारे उत्कृष्ठ २ संकल्पनांची निवड करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थामधून प्राप्त झालेल्या सर्वोत्तम २ संकल्पनांमधून १०० संकल्पनांची २५ सप्टेंबर रोजी निवड करण्यात येईल. २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील १०० नवउद्योजकांसाठी स्टार्टअप प्रवासाच्या मुलभूत गोष्टीबद्दल माहिती व सादरीकरण कसे करावे? यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येतील.

त्यानंतर १०० उद्योजकांचे सादरीकरण सत्र होईल. सत्राचे https://schemes.msins.in/ या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यातील उत्कृष्ठ १० विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये ३० टक्के महिला व ५० टक्के विजेते हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी असतील. या १० विजेत्यांमध्ये एक जिल्हा एक उत्पादन संबंधित नवसंकल्पना असल्यास २ विजेत्यांना प्राधान्य देण्यात येतील. या स्पर्धेमध्ये जिल्हातील जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त नीता औघड यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos