महत्वाच्या बातम्या

 मनपातर्फे राबविण्यात येणार मेरी मिट्टी मेरा देश अभियान  


- मातीचे दिवे व माती हातात घेऊन करा सेल्फी अपलोड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मेरी मिट्टी मेरा देश अभियान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. सदरउपक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आढावा बैठक २ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.    

आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविले जाणार आहे. नागरिकांत आपली मातीविषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मान व्हावा या यामागील उद्देश आहे.

या अभियाअंतर्गत शहरातील सर्व नागरिकांना स्वयंस्फूर्तीने हातात मातीचे दिवे अथवा माती घेऊन पंचप्रण शपथ घ्यायची असुन सदर सेल्फी merimaatimeradesh.gov.in या पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. वीर सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मनपा क्षेत्रात विशेष शिलालेख बसविण्यात येणार आहे. या शिलालेखावर देशासाठी,स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अश्या थोर व्यक्तींची नावे कोरण्यात येणार आहे. योग्य जागा निश्चित करून स्वदेशी ७५ रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे.

संरक्षण दल, निमसंरक्षण दल, पोलीस दलातील शहीदांचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा कार्यक्रमप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील, शहरातील माती जमा करून तो कलश दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका तयार करण्यात येणार असून त्यामध्ये देशभरातून आणलेली माती आणि लहान रोपे वापरली जातील. स्वातंत्र्यदिनी देशभरात यावर्षीही प्रत्येक घराघरात तिरंगा फडकविला जाणार असुन सदर कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, सहायक आयुक्त सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, नरेंद्र बोभाटे तसेच सर्व विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.   





  Print






News - Chandrapur




Related Photos