लाचखोर आरोपी रजत ठाकूर पोलीस ठाण्यातून पळाला, पोलीस दलात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांसोबत सेटिंग करून देण्याची भाषा वापरत ८० हजार रुपये मागणारा दलाल  रजत सुभाष ठाकूर (२९) रा. म्हाडा कॉलनी, हिंगणा  याला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्याला सीताबर्डी ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ठाण्यात मोठ्या संख्येत एसीबीचे तसेच ठाण्यातील पोलीस हजर असतानाही  रजत ठाकूर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याने पोलीस दलात   खळबळ निर्माण झाली आहे.
आरोपी ठाकूर पोलिसांचा दलाल (पंटर) म्हणून काम करतो. ठिकठिकाणच्या कुंटणखान्यांवर कारवाई करून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे समजते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील अनेकांसोबत त्याचा थेट संपर्क आहे.  
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने काही दिवसांपूर्वी एका कुंटणखान्यावर छापा मारून एकाला अटक केली. त्याच्या पत्नीसोबत आरोपी रजत ठाकूरने संपर्क साधला. तुमच्या पतीविरुद्ध झालेल्या कारवाईत त्यांना जामीन मिळावा म्हणून पोलीस प्रयत्न करतील तसेच भविष्यात त्याच्यावर कारवाई होणार नाही, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून आपण सर्व सेटिंग करून देतो, अशी हमी रजतने महिलेला दिली. त्याबदल्यात ८० हजारांची मागणी केली. महिलेने एवढी रक्कम देऊ शकत नाही, असे म्हटल्यानंतर त्याने ५० हजारांत सौदा पक्का केला होता. एकमुश्त रक्कम देता येत नसेल तर तीन किस्तीत रक्कम देण्याचेही त्याने सुचविले होते. महिलेने त्याला होकार देऊन सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीने सापळा लावला. महिलेने आरोपी रजत ठाकूरला १५ हजारांची पहिली किश्त देण्याची तयारी दाखविली. त्याने तिला अमरावती मार्गावरील म्हाडा वसाहतीच्या खासगी बसथांब्याजवळ बोलविले. मंगळवारी सायंकाळी १५ हजारांची लाच घेऊन महिला तेथे पोहोचली. रजतने लाचेची रक्कम स्वीकारताच  एसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला जेरबंद करून सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आले.
एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धीवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख तसेच कर्मचारी रविकांत डहाटे, दीप्ती मोटघरे, मंगेश कळंबे, रेखा यादव आणि वकील शेख यांनी ही कामगिरी बजावली.
पोलीस ठाण्यात रजतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी तेथे एसीबीचे तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी हजर होते. रात्री ७.३० ते ८ दरम्यान सर्वांची नजर चुकवीत रजत ठाकूरने ठाण्यातून पळ काढला. ठाण्याबाहेर एसीबीचे वाहनचालक उभे होते. रजत पळताना दिसताच त्यांनी पाठलाग करून त्याला झाशी राणी चौकाजवळ पकडले. यावेळी वाहनचालकासोबत झटापट करून त्यांना मारहाण करीत आरोपी रजत पळून गेला. लाच घेताना रंगेहात पकडलेला आरोपी चक्क ठाण्यातून पळून गेल्याच्या वृत्ताने एसीबी तसेच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.   Print


News - Nagpur | Posted : 2019-04-24


Related Photos