राज्यात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान


वृत्तसंस्था / मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱया टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी 61 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तवला. 14 मतदारसंघात पार पडलेल्या या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते, गिरीश बापट, सुप्रिया सुळे, रावसाहेब दानवे, सुनील तटकरे, उदयनराजे, नरेंद्र पाटील, राजू शेट्टी या दिग्गजांसह 249 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले. राज्यात सर्वाधिक कोल्हापूरमध्ये 69 टक्के, हातकणंगलेमध्ये 68.50 टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रातील 14 मतदार संघांतील 1 लाख 54 हजार मतदानकेंद्रांवर मतदान घेण्यात आले. दुपारच्या वेळेत उन्हामुळे मतदान काही काळ मंदावले असले तरी सायंकाळी 4 नंतर मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेक मतदार संघांत 6 नंतर रांगा संपेपर्यंत मतदान घ्यावे लागले. जळगावात 58 टक्के, रावेर 58 टक्के, जालना 63 टक्के, संभाजीनगर 61.87 टक्के, रायगड 58.6 टक्के, पुणे 53 टक्के, बारामती 59.50 टक्के, नगरमध्ये 63 टक्के, माढामध्ये 63 टक्के, सांगलीमध्ये 64 टक्के, साताऱयात 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 62.26 टक्के, कोल्हापूर 69 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के मतदान झाले. राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-24


Related Photos