कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याला २८ दिवसांची संचित रजा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली असून मुंबईतील मतदान संपल्यावर म्हणजे ३० एप्रिलला त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
एका शिवसेना नगरसेवकाच्या खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या काळात त्याने वेळोवळी कधी संचित रजा, तर कधी अभिवचन रजा घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याने कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज करून संचिन रजेची विनंती केली. त्याचा अर्ज उपमहानिरीक्षकांनी फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. सरकारने त्याला निवडणूक काळात सुटी दिल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवून विरोध केला होता. पण, गवळीने आपण यापूर्वीही अनेकदा रजा घेतली असून रजा संपताच कारागृहात हजर झालो आहे. त्या काळात आपल्याकडून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे आताही आपल्याला रजा मंजूर करावी, अशी विनंती केली. न्या. झका हक आणि न्या. विनय जोशी यांनी गवळीला २८ दिवसांची रजा मंजूर करून ३० एप्रिलनंतर सोडण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले. गवळीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा आणि अ‍ॅड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-04-24


Related Photos