ट्रकच्या हूकला ओढणी अडकल्याने तरुणीने गमावला जीव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
ओढणी ट्रकच्या हूकला अडकण्याचे निमित्त झाले अन् तरुणीला आपला जीव गमवावा लागला. ट्रकच्या चाकाखाली चिरडून ती ठार झाली. सुन्न करणारी ही घटना मंगळवारी सकाळी वाडी पोलिस स्टेशनसमोर घडली. पूजा ओमप्रकाश तिवारी (२८) रा. रघुपतीनगर असे या तरुणीचे नाव आहे. 
पूजाचे वडील ओमप्रकाश हे आयुध निर्माणीत काम करतात. ती एमआयडीसी चौकातील अजमेरा टायर्स येथे कार्यरत होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास ती  एमएच-४०-बीबी-१३३० या दुचाकीने  कामावर जात होती. पोलिस स्टेशनसमोर  एमएच-१२-एव्ही-४६०० क्रमांकाच्या ट्रकच्या  हूकला तिची ओढणी अडकली. त्याचवेळी ट्रकचा मोपेडला कट बसला. खाली पडून पूजा ट्रकच्या चाकाखाली आली. तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिस स्टेशनचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी चालकाला अटक केली. 
ओढणी ट्रकच्या हूकला अडकल्यानंतर पूजा खाली पडली. सुमारे १२ फुटांपर्यंत घासत गेली व ट्रकच्या चाकाखाली आली. चाकाखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. ही घटना बघणारे नागरिक सुन्न झाले. ओढणी अडकली अन् नाहक जीव गेला, अशी चर्चा परिसरात होती.   Print


News - Nagpur | Posted : 2019-04-24


Related Photos