तिसर्‍या टप्यासाठी देशभरात ६१.३१ टक्के तर महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्यासाठी आज २३ एप्रिल रोजी  ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्र राज्यात ५५.०५  टक्के मतदान झाले आहे. 
 संध्याकाळी पाचवाजेपर्यंत राज्यातील १४ तर देशभरातील ११६ जागांवर मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. आज राज्यातील पुणे, बारामती, सातारा, अहमदनगर या महत्त्वाच्या जागांवरील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान, सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले तिथे मतदानाचे प्रमाण ७८.९४ टक्के इतके होते. तर त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये ७४.०५ टक्के त्याखालोखाल गोव्यामध्ये ७०,९६ टक्के मतदान झाले आहे. तर केरळमध्ये मतदानाला गालबोट लागले आहे. येथे सहा मतदारांचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही अप्रिय घटना घडल्या. मुर्शीदाबाद येथील एका मतदान केंद्राजवळ काही अज्ञात लोकांनी हातबॉम्ब फेकल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नसले तरी मतदारांना घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
प. बंगालमध्ये मतदानादरम्यान एका मतदाराचा मृत्यू झाल्याची  घटना घडली. मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातील बालीग्राम येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेला एक मतदार गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
राज्यात १४ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.२८ टक्के मतदान झाले. रावेर लोकसभा मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४६.०३ टक्के मतदान झाले. तर जळगाव लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२.६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती.   Print


News - World | Posted : 2019-04-23


Related Photos