लैंगिक अत्याचारपीडित सहा आदिवासी अल्पवयीन मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये तात्पुरती भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलच्या वसतीगृहातील लैंगिक अत्याचारपीडित सहा आदिवासी अल्पवयीन मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये तात्पुरती भरपाई अदा करण्याचे  आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिले.   सरकारने ही रक्कम २९ एप्रिलपर्यंत चंद्रपूर सत्र न्यायालयात जमा करावी व त्यानंतर चौकशी समिती अध्यक्षांनी ती रक्कम पीडित मुलींच्या आईंच्या बँक खात्यात टाकावी, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, बँकांनी पुढील आदेशापर्यंत पीडित मुलींच्या आईंना ही रक्कम खात्यातून काढू देऊ नये असेही आदेशात स्पष्ट केले. 
शाळेतील मुलींच्या भविष्याचा विचार करता सरकारने शाळेचे व्यवस्थापन व सर्व चल-अचल संपत्ती ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर निर्णय घेऊन त्यावर २६ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे निर्देश सरकारला देण्यात आले. प्रकरणाच्या तपासात पुढील तारखेपर्यंत होणारी प्रगती व करण्यात येणारी कारवाई यावर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी उत्तर द्यावे, असेदेखील न्यायालयाने सांगितले. याशिवाय शाळा व्यवस्थापनाला प्रकरणात प्रतिवादी केले व त्यांना नोटीस बजावून पुढील तारखेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. तीन पीडित मुलींच्या आईंनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, पीडित मुलींना भरपाई देण्यात यावी यासह विविध मागण्या केल्या आहेत.   Print


News - Nagpur | Posted : 2019-04-23


Related Photos