अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयात नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागात शॉर्टसर्कीटमुळे आग, २२ बालकांचे वाचले प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती  :
येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागात आज शॉर्टसर्कीटमुळे अचानक स्फोट होवून धुराचे लोट उठले. स्फोटाचा आवाज, धुरांचे लोट व उग्र गंध यामुळे विभागात अंधाराचे साम्राज्य होवून गोंधळ उडाला. परंतु विभागात कार्यरत डॉक्टर, कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करून उपचाररत बालकांना तातडीने दुसर्‍या कक्षात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले.  
जिल्हा सामान्य स्त्री रूग्णालयात नवजात बालकांकरिता अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. जन्मानंतर प्रकृती स्वास्थ्यात सुधारणा करण्यासाठी नवजात बालकांना या कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. नवजात शिशु अतिदक्षता विभाग वातानुकूलीत असून याठिकाणी दोन कक्ष आहेत. यातील दोन्ही कक्षात तब्बल २२ बालकांवर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या कक्षाच्या शेजारी असलेल्या विद्युत नियंत्रण कक्षात अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज बाहेर आला. वायर जळत असल्याने धुराचे लोट बाहेर येवू लागले. यावेळी विभागातील इनबॉर्न युनीटमध्ये ९ मुले, २ मुली व आऊट बॉर्न युनिटमध्ये ७ मुले व १ मुली, असे एकूण २२ शिशु होते. स्फोट, धुराचे लोट व उग्र वासामुळे अतिदक्षता विभागात एकच गोंधळ उडाला. विभागात सर्वत्र काळोख पसरला होता. अंधारात काहीच दिसत नसतांना देखील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी वर्षा पागोटे, ललीता अटाळकर, नलीनी काळसर्पे यांचेसह ६ नर्सेस व पाच मावशी यांनी बालकांना दुसर्‍या कक्षात हलविले. संपूर्ण विभाग रिकामा केल्यानंतर या घटनेची माहीती अग्निशमन विभाग व महावितरण कंपनीला देण्यात आली. 
अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आलेल्या नवजात बालकांपैकी ४ बालकांना सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व ४ बालकांना डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित बालकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शॉर्ट सर्कीटमुळे ही घटना घडली असली तरी यात महावितरण कंपनीचा दोष असल्याचे डॉक्टर व कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. येथील फायर ऑडीट करण्यात यावे, यासाठी वेळोवेळी पत्र व पाठपुरावा करण्यात आला. तरीही याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण कंपनीकडून थातुर-मातुर दुरुस्ती करण्यात येतेय. या गंभीर समस्याचे निराकरण करण्याऐवजी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.     Print


News - Rajy | Posted : 2019-04-22


Related Photos