गुगल ने दिला 'गुगल डुडल' मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. गुगलने या खास दिवसाचे औचित्य साधून अ‍ॅनिमेटेड डुडल तयार केले आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीची नैसर्गिक दर्शन अ‍ॅनिमेटेड डुडलमधून देत गुगलने जागतिक वसुंधरा दिन दिन साजरा केला आहे. 
गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे. या अ‍ॅनिमेटेड व्हिडीओमधून संदेश देण्यात येत असून क्लिक केल्यानंतर व्हिडीओ सुरू होतो. डुडलच्या पहिल्या स्लाइडमध्ये वॉन्डरिंग अल्बट्रॉस पक्षी दिसतो. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पंखांचा हा पक्षी असून तो उडताना शेकडो मैलांपर्यंत पंख फडफडवत नाही. दुसऱ्या स्लाइडमध्ये सर्वाधिक उंच कोस्टर रेडवुड झाड आहे. जगातला सर्वात लहान बेडूक Paedophryne Amauensis ही आपल्याला दिसतो. चौथ्या स्लाईडमध्ये सर्वात मोठी पाणवनस्पती अ‍ॅमेझॉन वॉटल लिलीदेखील पाहायला मिळते. पृथ्वीवर ४०  कोटी वर्षांपासून अगदी डायनॉसोर काळापासून ज्याचं अस्तित्व आहे तो सीलकॅंथ पक्षीही या डुडलमध्ये आहे. जेव्हा पृथ्वी दिन सुरू झाला तेव्हा तो २१ आणि २२ एप्रिल रोजी साजरा केला जात असे. १९७० पासून २२ एप्रिलला हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. २२ एप्रिलला जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day) म्हणून साजरा करण्यात येतो. प्रदूषणामुळे जगभरामध्ये वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानि होत आहे. अशातच पर्यावरण रक्षणासाठी आणि वसुंधरेला सुंदर ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानेच प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे लहान लहान गोष्टीं लक्षात घेऊन आपण पृथ्वीच्या रक्षणासाठी मदत करू शकतो. त्यासाठी फक्त काही गोष्टी आपल्या आचरणात आणणं गरजेचं असतं.   Print


News - World | Posted : 2019-04-22


Related Photos