राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतलेल्या मैमुना बाशीद कडे आढळला संपर्काचा साठा


-  इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, कागदपत्रे एनआयएच्या हाती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  वर्धा : 
 'आयसिस' या दहशतवादी संघटनेशी तार जुळले असल्याच्या संशयावरून म्हसाळातील ज्ञानेश्वरनगरातून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतलेल्या मैमुना बाशीद यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये १३ मोबाइल, ११ सीम कार्ड, एक आयपॅड, दोन लॅपटॉप, एक हार्ड डिस्क, सहा पेन ड्राइव्ह, सहा एसडी कार्ड आणि तीन वॉकीटॉकीचा समावेश आहे. हे सर्व साहित्य वर्धा आणि हैदराबादमध्ये राबविण्यात आलेल्या तपास मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आले आहेत.  राष्ट्रीय तपास संस्थेने मैमुना बाशीद आणि तिची आई शाहिदाची सलग दुसऱ्याही दिवशी; रविवारी कसून चौकशी केली.
 रविवारीही सायंकाळपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. ही चौकशी प्राथमिक स्तरावरच असून ठोस काही हाती लागलेले नाही, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी नीरव रॉय यांनी दिली आहे. या एकूणच चौकशीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास म्हसाळा येथील ज्ञानेश्वरनगरमध्ये राहणाऱ्या भय्या ढाले यांच्या घरी दिल्लीहून एनआयएची टीम पोहोचली. सकाळीच हैदराबादवरून घरी पोहोचलेल्या मैमुना बाशीद (२३) ला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मैमुना आणि तिची आई शाहिदाला ताब्यात घेत सेवाग्राम पोलिस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. रविवारीही चौकशी सुरूच होती. एनआयए २०१६ मधील एका प्रकरणाचा तपास करीत आहे. एका प्रतिबंधित संघटनेत सहभागी होण्यासाठी मुस्लीम युवकांना प्रोत्साहित केले जात होते. संघटनेत सहभागी केल्यानंतर प्रशिक्षणही दिले जात होते. यासंबंधी माहिती मिळताच एनआयएने जानेवारी २०१६ मध्ये शेख अजहर उल इस्लाम, अधान हसन आणि मोहम्मद फरहान शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दिल्लीतून अटक केली होती. याच प्रकरणात ऑगस्ट २०१८ मध्ये आयसिसप्रती सहानुभूती ठेवल्याच्या आरोपात मोहम्मद अब्दुल बाशीद आणि मोहम्मद अब्दुल कादिरला हैदराबाद येथून अटक केली होती. अब्दुल बाशीद हा तिहारच्या तुरूंगात आहे. आयसिसशी याचा संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तर मैमुना ही त्याची दुसरी पत्नी असल्याचेही सांगण्यात येते. यंदा ७ फेब्रुवारीला एनआयएने 'अबुधाबी मॉड्युल' प्रकरणात दोन आरोपींविरोधात परत आरोपपत्र दाखल केले. याच आधारे मिळालेल्या सूत्रानुसार ही छापेमारी करण्यात आली.
वर्ध्याच्या म्हसाळा भागात राहणारी मैमुना ही वर्ध्याच्या जे. बी. सायन्स कॉलेजमध्ये बी.एससी. मायक्रोबायोलॉजीच्या द्वितीय वर्षापर्यंत शिकली. तिच्या मोठ्या बहिणीसोबत लग्नाकरिता अब्दुल बाशीदचे निमंत्रण आले होते. मात्र मैमुनाच्या आई शाहिदा यांनी या लग्नास नकार दिला होता. अशातच मैमुना आणि बाशीदचे संबंध वाढत गेले. दीड वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर मैमुनाने वर्धा सोडले. शनिवारी सकाळी शहरात आल्यानंतर एनआयएने तिला ताब्यात घेतले.   Print


News - Wardha | Posted : 2019-04-22


Related Photos