महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे.    

महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व उद्योजक बनण्याची स्वप्न साकारण्याकरिता योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालय किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी / विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. अर्ज करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. उपक्रम ३ टप्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थी स्टुडेंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवड प्रथम टप्यात करण्यात येईल.

दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या १०० नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट १० विजेते निवडले जातील. जिल्हास्तरीय विजेत्या प्रत्येकी रु. १ लाख बीज भांडवल देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्यात प्रत्येक जिल्ह्यातील १० अशा एकूण ३६० नवउद्योजकांना महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या ३६० नवसंकल्पनाचे  राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार असून यातून सर्वोत्कृष्ट १० नवउद्योजकांना प्रत्येकी ५ लाख रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे.

उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून  राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिली जाणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी.  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर ०७१२-२५३१२१३. मनिष कुदळे (९३२४२८८७२१) आणि योगेश कुंटे (८९९९६९४२२८) यांच्याशी संपर्क साधावा.       





  Print






News - Nagpur




Related Photos